कल्याण : कल्याण पूर्वचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघातील रस्ते विकास काम मार्गी लावण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंगाधिकाऱ्यांच्या मान्यतेने गेल्या वर्षी एक पत्र लिहिले होते. या पत्राच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने आता कार्यवाही सुरू केली आहे.कल्याण पूर्वचे आमदार असताना गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागातील अनेक लहान मोठी विकास कामे मार्गी लावली. आमदार निधी, जिल्हा विकास नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी पूर्व भागात विकास कामे केली. माजी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतरच्या घटनेपासून गेल्या वर्षापासून माजी आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तूरूंगात असताना आपल्या मतदारसंघातील आपण पाठपुरावा करत असलेली विकास कामे मार्गी लागावीत म्हणून माजी आमदार गणपत गायकवाड यांंनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना एक पत्र तुरुंगाधिकाऱ्यांच्या मान्यतेने लिहिले होते. गणपत गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे, की आपल्या मतदारसंघात मौजे दावडी गाव हद्दीत पालिकेचा विकास आराखड्यातील २४ मीटरचा एक रस्ता आहे. हा रस्ता रिजन्सी अनंतम येथून मलंंग रस्त्याला जोडणार आहे. अनेक वर्ष रखडलेला हा रस्ता मार्गी लागला तर या परिसराचा विकास होईल. या भागातील नागरिकांसाठी नवीन रस्ता उपलब्ध होऊन वाहतुूक कोंडीचा या भागातील प्रश्न मार्गी लागण्यास साहाय्यक होणार आहे. या रस्ते कामातील अडथळे दूर करून हा रस्ता लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करावेत. हा रस्ता पूर्ण होण्यासाठी आपण मागील दोन वर्षापासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत.

हा रस्ता मलंग रस्ता भागात जेथे मुख्य रस्त्याला जोडला जाणार आहे. तेथे एक चौक निर्माण होतो. या चौकात चारही बाजुचे रस्ते एकमेकांना जोडले तर या भागातील वाहन कोंडी दूर होईल. हा रस्ता लवकर मार्गी लागेल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी गणपत गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्व विधानसभेचे नेतृत्व आता गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड करत आहेत. गणपत गायकवाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास समर्थक मानले जातात. रस्त्यासाठी कारवाई या रस्ते मार्गात काही चाळी, एक बेकायदा इमारत आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यासाठी साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी नियोजन केले आहे. परंतु पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही कारवाई रखडली. वास्तुविशारद संदीप पाटील हेही हा रस्ता मार्गी लागावा म्हणून पालिकेकडे पाठपुरावा करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpat gaikwad wrote letter to kalyan dombivli municipal commissioner with jail approval sud 02