गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘गणपती विशेष’ गाडय़ांची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात तब्बल ६० हून अधिक गाडय़ा कोकणात जाणार असून त्यातील एकाही गाडीला दिव्यात थांबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या काळात कोकणात जाण्यासाठी विशेष डेमू ट्रेनही सोडण्यात येणार असून त्याच्या ३६ ही फेऱ्या पनवेल स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे, दिवा आणि कल्याण-डोंबिवली तसेच अंबरनाथ, बदलापूर या भागातून येणाऱ्या प्रवाशांना पनवेल गाठावे लागणार आहे. त्यामुळे पनवेल येथून सोडण्यात येणारी डेमू गाडी दिवा स्थानकातून सोडल्यास त्याचा फायदा या भागातील प्रवाशांना होऊ शकेल. दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र देऊन तशी मागणी करण्यात आली आहे.गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी मुंबई, ठाणे स्थानकात उसळत असून अशा गर्दीसाठी रेल्वेच्या वतीने विशेष गाडय़ांची घोषणा केली जाते. मात्र या विशेष गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा दिला जात नसून त्याचा फटका दिवा आणि कल्याण पलिकडच्या प्रवाशांना बसतो. अशावेळी या भागातील प्रवाशांना अवजड सामान आणि बॅगा घेऊन ठाणे गाठावे लागते. त्यामुळे ठाणे स्थानकातील फलाटांवर मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊन अपघाताचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी कसरत करत गाडी पकडण्याची वेळ प्रवाशांवर येत असते. रेल्वे प्रशासानाने अशा लोकांची सोय लक्षात घेऊन पनवेल स्थानकातून चिपळून पर्यंत ‘डेमू’ गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र या गाडीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पनवेल पर्यंत जावे लागणार असून तेथून डेमू गाडीतून प्रवास करावा लागणार आहे. ही डेमू गाडी दिवा स्थानकातून चालवल्यास कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होऊ शकेल. या मागणीचे पत्र दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेचे व्यवस्थापकांसाठी देण्यात आले आहे.

दिव्यातून गाडी हवी..
कोकणात राहणारे बहुसंख्य चाकरमानी दिवा, ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात राहत असून दिवा स्थानक या सगळ्यांसाठी जवळचे आणि कमी गर्दीचे स्थानक वाटते. दिवा स्थानकात त्यामुळे नेहमी वर्दळ असते. मात्र गाडी नसल्याने या प्रवाशांची निराशा झाली असून दिव्यासाठी ‘डेमू’ ही योग्य गाडी ठरू शकेल.
– अ‍ॅड, आदेश भगत,
अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना

Story img Loader