पालिकेचे नियम मंडळाकडून पायदळी; प्रवाशांना ‘सॅटिस’वरून ये-जा करणे कठीण

सार्वजनिक उत्सवांचा त्रास सर्वसामान्य जनतेला होऊ नये, यासाठी नियमांच्या कडक अंमलबजावणीकडे लक्ष देण्याचे ठाणे महापालिकेने जाहीर केले आहे. मात्र, पालिकेचे हे नियमच पायदळी तुडवत ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाच्या परिसरात गणेशोत्सव मंडळाने मंडप थाटला आहे. महापालिकेने उत्सवांसंबंधी आखलेल्या नियमात रेल्वे स्थानके तसेच उड्डाणपुलांच्या पायऱ्यांलगत मंडप उभारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन नियम मोडणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशांकडे साफ दुर्लक्ष करून सॅटिस पुलाजवळील जागेत मंडप उभारण्यात आला असून यामुळे प्रवाशांना स्थानकात ये-जा करणे कठीण बनले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ठाणे महापालिकेने उत्सवांच्या आयोजनासंबंधी एक नियमावली तयार केली आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर, चढण्या उतरण्याच्या ठिकाणी मंडप बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली जावी, असा खुद्द आयुक्तांचा आग्रह आहे. दोन दिवसांपूर्वी जयस्वाल यांनी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यामध्ये गणेशोत्सवात नागरिकांची अडवणूक करणाऱ्या मंडपांवर कारवाई करा असे स्पष्ट आदेश जयस्वाल यांनी दिले. असे असतानाही सॅटिसच्या पायऱ्यांलगत गणेशोत्सव मंडळाने मंडप उभारला आहे.  ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिसच्या उतरण्याच्या पायऱ्यांच्या बाजूचा भाग काही संघटना गणेशोत्सवासाठी वापरत असतात. वर्षांभरातील अनेक सण आणि उत्सवांच्या काळामध्ये इथे मंडप उभारला जातो. त्यामध्ये सत्यनारायणाच्या पुजेपासून ते नवरात्रीच्या उत्सवापर्यंत नऊ ते बारा दिवस हा भाग व्यापला जातो. यंदा गणेशोत्सवाच्या मंडप उभारण्या संदर्भात महापालिकेने केलेल्या नियमावलीमुळे या भागातील मंडपाचा आकार लहान केला जाईल असा प्रवाशांचा समज होता. परंतु प्रत्यक्षात दरवर्षी बांधला जातो त्यापेक्षाही अधिक मोठा आणि रस्ता आडवणारा मंडप यंदा या मंडळाने उभारला आहे. सॅटिसच्या मोकळ्या जागेबरोबरच सॅटिसच्या खालच्या भागातही या मंडपाचा भाग गेला असल्यामुळे बी-केबिनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

महापालिका, पोलीस प्रशासनाने कोणतीही खातरजमा न करता या मंडळांना परवानगी दिलीच कशी, असा सवाल ठाणेकर करू लागले आहेत.

गणेशोत्सवाला आमचा विरोध नसला तरी प्रवाशांना त्रास देणाऱ्या अवाढव्य मंडपाला आमचा कठोर विरोध आहे. मंडप इथून तात्काळ हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे रेल्वे उपनगरीय प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

चेंगराचेंगरीची भीती

ठाणे रेल्वे स्थानकातून पश्चिमेकडे बाहेर पडण्यासाठी सॅटिसखालची मोकळी जागाच महत्त्वाची आहे. फलाट क्रमांकमहापालिका ण दोनवरून येणारे प्रवासी, त्याचवेळी सॅटिसवरील दोन्ही जिन्यांवरून खाली येणारे प्रवासी या मंडपाच्या समोरच येतात. त्यात त्यांना बाहेर पडण्यासाठी बी-केबिनकडील मार्ग या मंडपाने अडवून टाकला आहे. त्यामुळे एकाच वेळी स्थानकातून बाहेर पडणारे आणि स्थानकात जाणारे प्रवासी आल्यास इथे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. वर्षभर या भागामध्ये फेरीवाले असतात. मंडप बांधल्यानंतरही हे फेरीवाले या भागातच असल्यामुळे प्रवाशांनी जायचे तरी कुठे, असा सवाल प्रवासी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.

Story img Loader