बदलापूरच्या मूर्तिकाराचा यशस्वी प्रयोग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’मध्ये घडवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नसल्याने होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीचे विविध पर्याय पुढे येत असताना यात आता आणखी एका सामग्रीची भर पडली आहे. बदलापुरातील एका मूर्तिकाराने कागद आणि लांबीचा वापर करीत घडवलेल्या गणेशमूर्ती वजनाने हलक्या असून त्या तासाभरात पाण्यात विरघळून जातात, असा दावा या मूर्तिकाराने केला आहे. या मूर्तीचे दरही अन्य पर्यावरणस्नेही मूर्तीच्या तुलनेत कमी असल्याने भाविकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवा पर्याय मिळाला आहे.

बदलापूर गावात राहणाऱ्या रवींद्र कुंभार या मूर्तिकाराने कागद आणि भिंती रंगवण्याआधी वापरण्यात येणाऱ्या लांबीचा वापर करीत गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यांच्या या प्रयोगामुळे मूर्तीची निर्मितीची किंमत घटली असून वजनाला जड असणाऱ्या शाडूच्या मूर्तीना चांगला पर्यावरणस्नेही पर्याय उपलब्ध झाला आहे. शाडूच्या मातीची उपलब्धता आणि किंमत यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती महाग असतात. त्यांचे वजनही अधिक असते. त्यामुळे त्या हाताळताना कठीण जातात. मात्र नव्याने तयार केलेल्या या मूर्ती हलक्या असल्याने आणि त्यातील साहित्यही पर्यावरणपूरक असल्याने अवघ्या तासाभरात या मूर्ती पाण्यात विरघळतात, असे रवींद्र कुंभार सांगतात.

विनामूल्य प्रशिक्षण

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची चळवळ वाढावी यासाठी रवींद्र कुंभार स्वखर्चातून विनामूल्य मूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण देणार आहेत. कृष्णाई कला केंद्राच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात होणार असून हे प्रशिक्षण अशा मूर्ती घरच्या घरी तयार करण्यास मदत व्हावी यासाठी आयोजित केले जाणार आहे.

सोपी पद्धत

लांबी आणि कागदापासून मूर्ती तयार करण्याची ही प्रक्रिया सोपी असून कागद भिजवून त्यात डिंक टाकून त्याच वेळी लांबीचे मिश्रण तयार करून हे दोन्ही एकत्र करण्यात येतात. या मिश्रणाला नेहमीच्या वापराच्या साच्यात टाकून  मूर्ती तयार करता येतात. या मूर्ती सहजरीत्या सुकतात आणि विसर्जनानंतर सहज विरघळतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati murti from papers
Show comments