गावदेवी मैदान, शिवाजीनगर अंबरनाथ पूर्व

नागरीकरणाच्या रेटय़ात मनाला समाधान देणाऱ्या अनेक गोष्टी दिवसेंदिवस शहरातून गायब होताना दिसत आहेत. त्यात मोकळी मैदाने आणि बाग या गोष्टींही दुर्मीळ होत असल्याचे दिसून येते. चहुबाजूंनी हिरव्या वृक्षांनी वेढलेले, चालण्यास सहज, सोपे, शहराच्या मधोमध असे मैदान शहरात सापडणे कठीण होऊ लागले आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अशा जागेची आवश्यकता असते. कारण खेळ आणि व्यायाम मोकळ्या जागेतच चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मात्र अंबरनाथ शहरात शिवाजीनगरजवळ असलेले नगर परिषदेचे ‘गावदेवी मैदान’ हे मात्र त्यास अपवाद ठरले आहे. विशेष बाब म्हणजे फक्त प्रशासनाच्या प्रयत्नांवरच अवलंबून न राहता येथे येणारा प्रत्येक नागरिक हा त्या मैदानाची काळजी घेत असतो. लोकसहभागातून राखलेले मैदान असे याचे वर्णन करता येईल..

सुसज्ज जॉगिंग ट्रॅक, पेव्हर ब्लॉक असले तरी चालताना त्रास होणार नाही अशी रचना, ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना छोटी मोठी झाडे, तब्बल सहा एकरावर पसरलेला संपूर्ण ट्रॅक, बाजूला दमल्यानंतर बसण्यासाठी बगिचा, झाडा फुलांच्या सान्निध्यात बसण्यायोग्य रचना अशा अनेक सुविधांमुळे गावदेवी मैदान हे नागरिकांसाठी सोयीचे ठरते. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री जेवल्यानंतर शतपावली करेपर्यंत नागरिक या मैदानाचा वापर करताना दिसतात. ऐन पावसाळ्यात मैदानात मॉìनग वॉक किंवा सायंकाळचा फेरफटका मारण्याचे अनेकजण टाळतात. मात्र अंबरनाथमधील हे मैदान याबाबतीतही अपवादच ठरले आहे. पावसातही अनेक नागरिक येथे छत्री घेऊन फिरताना दिसतात. मैदानाच्या एकूण क्षेत्रफळाचे अनेक भागांत विभाजन करून प्रत्येक घटकाला समाधान देण्याचा प्रयत्न या मैदानात केलेला दिसते. मैदानाच्या प्रवेशद्वारावरच सुसज्ज साहित्यांनी परिपूर्ण असलेली विनामूल्य व्यायामशाळा आपल्याला दिसते. येथे वेळेचे नियोजन करून पुरुष आणि महिलाही व्यायामशाळेचा उपयोग करत असतात. त्यामुळे एका अर्थाने स्त्री-पुरुष समानता येथे पाहायला मिळते. संपूर्ण मैदानाच्या संरक्षण भिंतीवर पर्यावरण रक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समानतेचे संदेश देण्यात आले आहेत. आसपासच्या सर्वच शाळांसाठी हे मैदान क्रीडा महोत्सवासाठी हक्काचे आणि उपयुक्त ठिकाण ठरले आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही येथे मुलांची खेळण्यासाठी गर्दी असते.

मैदानाच्या एका बाजूला ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांना खेळण्यासाठी घसरगुंडी, पाळणे यांची विशेष सोय करण्यात आली आहे. त्यामुळे अबालवृद्ध एकत्रितपणे या मैदानाचा लाभ उठवत असतात. गेल्या दोन वर्षांत या मैदानाचा विकास करत असताना विविध मुद्दय़ांचा विचार केल्याचे दिसून येते. पाण्याचा निचरा होण्यासाठी करण्यात आलेली योजना असो किंवा नव्याने पाण्याच्या सोयीसाठी खोदण्यात आलेली कूपनलिका. त्यातही पर्जन्य जलसंधारणाचा प्रयोग करण्यात येतो आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरीचीही व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या खेळांना पाहण्यात प्रेक्षकांना अडथळा येत नाही. लवकरच या ठिकाणी छतही टाकण्यात येणार असल्याचे स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंखे सांगतात. तसेच खेळाडूंना कपडे बदलण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाचीही व्यवस्थाही येथे करण्यात आली असल्याने येथे येणाऱ्या खेळाडूंना हे मैदान सोयीचे ठरते.

लोकसहभागातूनही राखली जाते मैदानाची निगा

अनेकदा शासनाच्या प्रयत्नांची वाट पाहात, त्यावर टीका करत त्यांच्याकडूनच प्रत्येक गोष्टींची अपेक्षा केली जाते. मात्र गावदेवी मैदानाची निगा राखताना नागरिक स्वत: येथील सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. झाडांची वाढलेली उंची, फांद्या अनेक ज्येष्ठ नागरिक स्वत: कापतात. कचरा असो वा झाडांची निगा राखणे असो, यावरही येथील जॉगर्स क्लब लक्ष ठेवून असतो. त्यामुळे मैदानात किंवा बगीच्यात गैरप्रकारही होत नाहीत. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाने मैदानाची जबाबदारी घेतल्याने लोकसहभागाची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे प्रशासनही येथे एखादी नवी गोष्ट विकसित करताना नागरिकांची मते विचारात घेत असते.

जॉगर्स पार्कचा जिव्हाळा आणि जबाबदारी

येथे फिरण्यासाठी येणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मिळून एक जॉगर्स पार्क तयार केला आहे. या माध्यमातून सर्व सदस्य एकमेकांच्या सुख-दु:खात धावून जात असतात. एकमेकांचे वाढदिवस, आनंदाचे क्षण साजरे करत त्यांनी वेगळी परंपरा सुरू केली आहे.

मैदानाच्या विकासासाठी अनेक उपक्रम या क्लबच्या माध्यमातून हाती घेतले जातात. आपल्या घरच्या बागेप्रमाणे या मैदानाची काळजी घेताना इथले सदस्य दिसतात.

अनुभवाचे बोल

गावदेवी मैदानाचा वापर आम्ही अनेक खेळांसाठी करत असतो. गेल्या काही महिन्यांत या मैदानाचा चांगल्या प्रकारे विकास झाला आहे. येथे उपलब्ध असलेली मोफत व्यायामशाळा आणि मैदानामुळे गजबजलेल्या अंबरनाथ शहरातही आम्हाला चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ  शकतात, याचा विश्वाास वाटू लागला आहे. त्यामुळे या मैदानाची आणि व्यायामशाळेची आम्हीही काळजी घेत असतो. शहराच्या मध्यभागी असे मैदान उपलब्ध झाल्याने माझ्यासारख्या अनेक खेळाडूंना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

– अक्षय डोंगरे, खेळाडू.

मैदानाच्या माध्यमातून आम्ही निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आलो आहोत. दररोज सकाळच्या वेळी आम्ही येथे जमत असतो. वृद्धापकाळात आरोग्याचा समतोल राखण्यासाठी येथील वातावरण आणि भोवतालच्या सुविधांची मदत होते. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवल्याचे मोठे मानसिक समाधान मिळते. मॉìनग वॉकच्या वेळी शांत संगीताची सुविधा उपलब्ध झाल्यास पहाटेच्या वेळचे वातावरण आणखी प्रसन्न होईल.

– सुनील देशपांडे, ज्येष्ठ नागरिक.

दिवसभराचा कामाचा क्षीण या मैदानात येऊन संपतो. रोजच्या कामांतून वेळ काढत काही काळ गावदेवी मैदानातील बगीच्यात येऊन आम्ही क्षीण घालवत असतो. लहान मुलांना खेळण्याची सुविधा असल्याने एकाच वेळी आम्ही शतपावली आणि त्याच वेळी लहानग्यांचे खेळही खेळून होत असतात.

– नूतन तांबे, गृहिणी.

पहाटे आणि रात्रीच्या वेळी आम्ही या मैदानात वॉकसाठी येत असतो. वॉकिंग ट्रॅक बनविल्याने मैदानात खेळ सुरू असतानाही आम्ही फिरू शकतो. अनेकदा आम्ही नातवंडांनाही सोबत घेऊन इथे फिरायला येत असतो. आसपास झाडांची संख्या जास्त असल्याने वातावरण प्रसन्न राहते.

– सावित्री शितोळे, ज्येष्ठ नागरिक.

सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी आम्ही येथे फेरफटका मारण्यासाठी येत असतो. मोकळ्या वेळेत शांतता लाभण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. या ठिकाणी अनेकदा गर्दी असते, त्यामुळे बसण्यासाठी जागा राहात नाही. त्यामुळे आसनव्यवस्था वाढविल्यास सोयीचे ठरेल.

– सुजाता राव, गृहिणी

घरच्या कामांतून वेळ काढून आम्ही येथे येत असतो. सध्या मैदान आणि त्यातील सुविधा पुरेशा आहेत. मात्र त्याच वेळी येथील उद्यानाचा आणखी विकास होऊ  शकतो. सुंदर फुलांची झाडे येथे लावल्यास वातावरण आणखी प्रसन्न होण्यास मदत होईल. अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात याचा समावेशही व्हावा ही आशा आहे.

– सुनंदा चौगुले, गृहिणी.

शहरातील धकाधकीच्या जीवनात सुसज्ज मैदान असणे ही समाधानाची बाब आहे. सीमेंटच्या जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात पहाटे माìनग वॉकसाठी हे मैदान एक उत्तम सुविधा आहे. येथील मोकळ्या जागेवर योगासनेही आम्ही करतो. फक्त योगासनांसाठी मोकळ्या जागेत छताची सुविधा झाल्यास येथे शांतपणे योगाची आसने करता येईल.

– योगेश आनवेकर, खेळाडू.

Story img Loader