कल्याणातील दूधनाका परिसरात काही महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दूधनाका परिसरातील रस्त्यांच्या गटारे तुंबू लागल्याने या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या कचराकुंडय़ाही ओसंडून वाहू लागल्या आहेत.
दूधनाका परिसरातील रेतीबंदर रोडवरील रस्त्याच्या एका बाजूने वाहणारे गटार नेहमीच तुंबलेले असते. महापालिकेकडून या भागात सफाई होत नसल्यामुळे रहिवाशांना या घाणीतून वाट काढणेही कठीण होऊ लागले आहे. येथील हमालवाडी परिसरात महापालिकेमार्फत गटाराची नव्याने बांधणी केली जाईल, असे आश्वासन स्थानिक लोकप्रतिनिधींकडून देण्यात आले होते. दूधनाका परिसरात गुप्ते चौक, घास बाजार, रेती बंदर रोडवरील व्हाइट हाऊस आणि गफूरडोन चौकातील कचरा वेळेवर उचलला जात नसला तरी स्थानिक नगरसेवकाच्या घरामागे ठेवण्यात आलेली कचराकुंडीत कचरा नावालाही दिसत नसल्याचे काही रहिवाशांनी सांगितले. परिसरातील बऱ्याचशा गटारांच्या पुनर्बाधणीचे काम सुरू  आहे. यावर्षी नालेसफाईच्या पाहणीला दिरंगाई झाल्याने त्याचा परिणाम गटार साफसफाईच्या कामांवर होताना दिसतो. दूधनाका परिसरातील कचराकुंडय़ांच्या दुरवस्थेविषयी विचारणा केली असता माझा प्रभाग स्वच्छ आहे, असा दावा नगरसेवक बाळ हरदास यांनी केला.

परिसरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील, दुकानातील कचरा गटारीत न टाकता कचराकुंडीतच टाकणे आवश्यक आहे. परिसरात वाढत्या अस्वच्छतेचे खापर फक्त महापालिकेवर न फोडता लोकांच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे
– मिनाज फक्की, कल्याण</strong>

Story img Loader