विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोदी ब्रिगेडची स्थापना करत कचरामुक्त डोंबिवलीची आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेली घोषणा एव्हाना हवेत विरू लागली असून शहरातील अनेक भागात कचराकुंडय़ा अक्षरश: ओसंडून वाहू लागल्याने रहिवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शहर स्वच्छ रहावे यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन हे अभियान राबविण्याचा बाता मारल्या होत्या. प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आणि त्या माध्यमातून डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मोदी ब्रिगेडची स्थापना केली. शहर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य असून मुळात नागरिकांनीही आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे अशी मानसिकता तयार व्हायला हवी, असे चव्हाण त्यावेळी सांगत असत. यावेळी शहरातील मुख्य ठिकाणच्या २५ कचराकुंडय़ांची पाहणी करण्यात आली. या कचराकुंडय़ा दिवसातून तीन ते चार वेळा भरतात असे आढळून आले होते. महापालिककेडे सफाई कर्मचारी आहेत, मात्र वाहनचालक नसल्याने चव्हाण यांनी तत्काळ आयुक्त सोनावणे यांच्याशी चर्चा करून १८ नवीन वाहनचालकांची नेमणूक करून घेतली होती. या २५ ठिकाणच्या कचराकुंडय़ा साफ होतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मोदी ब्रिगेड तैनात करण्यात आली होती. या ब्रिगेडमध्ये सहभागी सदस्य शहरात ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्याची थेट तक्रार आयुक्तांकडे करणार होते. मात्र चार महिने उलटताच या कचराकुंडय़ा पुन्हा एकदा भरून वाहू लागल्याने ‘मोदी ब्रिगेड’वाले गेले कुठे, असा सवाल आता रहिवासी उपस्थित करू लागले आहेत.
सुरुवातीचे काही दिवस महापालिकेचे कर्मचारी दिवसातून दोन वेळा कचरा उचलून नेत होते. मात्र आता दुपारचे बारा वाजले तरी कचराकुंडी साफ झालेली दिसत नाही. डोंबिवली पश्चिमेतील मासळी बाजार येथील कचराकुंडी, आयरेगाव, स.वा.जोशी शाळा अशा अनेक ठिकाणच्या कचराकुंडय़ा २४ तास ओसंडून वाहत असून त्यामुळे आमदारांनी आखलेल्या जुन्या अभियानाची आठवण नागरिक काढू लागले आहेत. कचरा उचलला जातो की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मोदी ब्रिगेड तैनात करण्यात आले आहे याविषयी आम्हाला माहितीच नाही असे नागरिक अश्विन सकपाळ यांनी सांगितले.
शहरात बाराही महिने २४ तास कचराकुंडय़ा ओसंडून वाहत असतात. नागरिक कचराकुंडीच्या बाहेरच कचरा फेकतात, रस्त्यावरील भटकी कुत्री तो इतरत्र पांगवतात त्यामुळे प्रवाशांना दरुगधीचा सामना करावा लागतो असेही ते म्हणाले.

मोदी ब्रिगेडचे काम सुरू आहे. स्टेशन परिसरातील कचराकुंडय़ा दिवसातून तीन वेळा साफ केल्या जातात. काही ठिकाणच्या कचराकुंडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रात्री ८ वाजता एक कचरागाडी स्टेशन परिसरात फिरते. मात्र आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने शहर पूर्ण स्वच्छतेसाठी काही कालावधी आम्हाला लागेल, असे ते म्हणाले. महापालिकेनेही आम्हाला सहकार्य करावे, वाहनचालकांची कमतरता आहे, मात्र पालिकेकडे केवळ पाच ते सहा वाहनचालकांनी अर्ज पाठविले असल्याचे समजते. त्यांचीही नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळेस केवळ एक वाहनचालक आपल्याकडे आहे.
 -भास्कर आजगावकर , मोदी ब्रिगेडचे प्रमुख

Story img Loader