लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले तसेच आस्थापनांनी या कचऱ्याची आपल्या आवारातच विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणीकरिता यापुर्वी बजावण्यात आलेल्या नोटीसला प्रतिसाद मिळालेला नसतानाच, ठाणे महापालिकेने आता पुन्हा अशाच स्वरुपाच्या नोटीसा पुन्हा पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील दोन हजार गृहसंकुलांसह चार मॉलला पुढील आठवड्यापासून नोटीसा बजावण्यात येणार असून या कचरा विल्हेवाट सक्तीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेली तसेच दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थापनांना कचरा विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी घेतला होता. या निर्णयानुसार पालिका प्रशासनाने गृहसंकुल आणि आस्थापनांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्यामध्ये आवारातच विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणीसाठी मुदत देऊ केली होती. या निर्णयास गृहसंकुलांनी विरोध केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. तसेच महापालिका प्रशासनापुढेही मोठा पेच निर्माण झाला होता. राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही प्रतिसाद मिळाला नव्हता. यानंतर पालिकेने नोटीसा पाठविणे बंद केल्याने हे प्रकरण थंडावले होते. असे असतानाच, ठाणे महापालिकेने आता पुन्हा अशाच स्वरुपाच्या नोटीसा पुन्हा पाठविण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

आणखी वाचा-अंबरनाथ: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भूखंड सुपूर्द

ठाणे महापालिका प्रशासनाने यापुर्वी ४२५ गृहसंकुल आणि आस्थापनांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु आता शहरातील गृहसंकुलांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेकडून नव्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेली तसेच दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुलांचा माहिती गोळा केली जात आहे. प्राथमिक सर्वेक्षणात १४० गृहसंकुलांमध्ये १०० किलो पेक्षा अधिकचा कचरा निर्माण होत असल्याचे समोर आले असून या संकुलांना सुरूवातीला नोटीसा बजावण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. सध्यस्थितीत हिरानंदानी इस्टेट परिसरात ५ मेट्रीक टन घनकचरा विल्हेवाट प्रकल्प राबविला जात आहे. तसेच शहरातील इतर काही संकुलातही घनकचरा विल्हेवाट प्रकल्प राबविला जात आहे, असे सुत्रांनी सांगितले.