कल्याण-डोंबिवली परिसरात दहीहंडी उत्सवांच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
या दोन्ही शहरांत रस्ते अडवून आणि चौकात दहीहंडय़ा उभारण्यात आल्या. न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करण्यात आली. एकीकडे रस्ते अडवून नागरिकांची अडवणूक केली जात असताना उत्सवांच्या ठिकाणी साचलेला कचऱ्याचा ढीग सोमवारी सकाळपर्यंत उचलण्यात आला नव्हता.
थर्माकोलच्या बश्या, पत्रावळी रस्त्यावर टाकून देण्यात आल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिवसभर दहीहंडीच्या ठिकाणी कार्यरत कार्यकर्त्यांना दहीहंडी संयोजकांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी थर्माकोल, कागदाच्या बश्या, पत्रावळींचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात आला. या पत्रावळी, बश्या उत्सवी कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा करण्याच्या परिसरात असलेल्या सोसायटय़ांचे कोपरे, आवारात फेकून दिल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उत्सव साजरे करताना सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार उत्सवांच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाच्या कचराकुंडय़ा ठेवण्यात याव्यात, असे आदेशही काढण्यात आले होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने काढलेले हे आदेश मंडळांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसून आले. कल्याण-डोंबिवलीतील बडय़ा राजकीय नेत्यांनी न्यायालयाच्या आदेशाला वाकुल्या दाखवत साजरा केलेल्या उत्सवांमुळे नवा वाद उभा राहिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत रस्ते अडवून उत्सव साजरे केले. पोलीस आणि महापालिका प्रशासनाने या वेळी बघ्याची भूमिका घेतली. जवळपास सर्वच चौकांमध्ये रस्ते अडवून ध्वनिक्षेपकाचा धणधणाट करीत उत्सव साजरे होत असताना आवाजाची पातळी मोजण्यापलीकडे पोलिसांनी फारसे काही केले नाही.
न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांची एकीकडे पायमल्ली होत असताना दुसरीकडे मंडळाकडून मोठय़ा प्रमाणावर कचरा करण्यात आल्याने नागरिकामधून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.

Story img Loader