कंक्राटी खाडीतील कचऱ्याचा प्रश्न निर्माण
खाडी किनाऱ्याची धूप थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तिवरांची झाडे प्लास्टिक प्रदूषणात सापडली आहेत. डहाणू येथील खाडी किनाऱ्यावर तर मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जमा होत असल्याचे त्याचा विपरीत परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांपासून कंक्राटी खाडीतून समुद्रात सोडण्यात प्लास्टिक कचरा ओहोटीनंतर तिवरांच्या झाडांमध्ये जमा होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन हा कचरा साफ करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणावर तिवरांची झाडे आहेत. परंतु प्लास्टिक आणि प्रदूषणामुळे ती नष्ट होत आहेत. जमीन, पाणी प्रदूषित झाल्याने त्याचा फटका तिवारांमध्ये प्रजननासाठी येणाऱ्या सागरी जीवांना बसत आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे त्यांची प्रजननाची ठिकाणे बदलली. खेकडे, विविध लहान प्रजातीचे मासे यांचा त्यात समावेश आहे. ज्या भागात प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होऊ लागले तेथून हे प्राणी दिसेनासे झाले आहेत.
तिवरांची संख्या कमी झाल्याने पक्षीही या भागात फिरकणे कमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दररोज येणारा प्लास्टिक कचरा पाहता ही समस्या जटिल स्वरूप धारण करत आहे. त्यास थोपवणे कठीण झाले आहे. या प्लास्टिकमुळे तिवरांना हानी पोहचवू लागल्याने शासकीय स्तरावर याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे. दररोज शेकडो टन प्लास्टिक या भागात साठत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ‘समुद्रकिनारे स्वच्छता अभियान’ राबविले पाहिजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
डहाणूत प्लास्टिकबंदी असतानाही जलाराम मंदिरापासून सुरू होणाऱ्या खाडीत नागरिक दररोज कचरा टाकत आहे. समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर आलेला हा कचरा तिवरांमध्ये अडकून राहतो. नगर परिषद पुन:पुन्हा साफसफाई करते. पण नागरिकांकडून दररोज कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याचे प्रदूषण होत आहे.
– अतुल पिंगळे, मुख्याधिकारी, डहाणू नगरपरिषद

Story img Loader