महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेची पंचाईत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवा, शिळ परिसरातील कचराभूमी तातडीने बंद करावी अशी मागणी गुरुवारी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी करुन ठाण्यातील सत्ताधारी  शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. महापालिका प्रशासनाने याच भागात बंद पडलेल्या खाणींमध्ये कचराभूमी सुरू  करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यापूर्वीच दिव्यातील कचराभूमी बंद करण्याचा आग्रह भोईर यांनी धरल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ठाणे शहरातून दररोज ६५० मेट्रीक टन इतक्या प्रचंड प्रमाणात ओला आणि सुका कचरा निघत असतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी डायघर परिसरात शास्त्रोक्त पद्धतीची कचराभूमी उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी त्यास कडाडून विरोध केल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला नाही. सद्य:स्थितीत महापालिका प्रशासन दिवा परिसरातील खासगी जागेवर कचरा नेऊन टाकते. सुमारे १५० ते २०० ट्रक ओला व सुका कचरा नेहमीच या जागेवर टाकण्यात येतो. या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने मध्यंतरी प्रदूषण नियंत्रण मंडळानेही महापालिकेस नोटिसा बजाविल्या होत्या. ठाणे शहरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शिळ परिसरातील वनविभागाच्या अखत्यारीत येणारी बंद खदाणींचा जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वन आणि पर्यावरण विभागाने या प्रकल्पास हिरवा कंदील दाखविला असून येत्या महिनाभरात ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू असताना दिवा येथे सद्य:स्थितीत सुरू असलेली कचराभूमी बंद करण्याची मागणी शिवसेनेचे स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनी केल्याने महापालिका प्रशासनाचे तोंडचे पाणी पळाले आहे.

महापालिकेच्या या बेकायदा व्यवस्थेमुळे दिवा, साबे, आगासन, दातिवली, म्हतार्डी, खर्डी या गावांतील लाखो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डम्पिंग ग्राऊंड शेजारी असलेल्या खाडीतील पाणी दूषित होऊन मोठय़ा प्रमाणावर मासे व शेतजमिनीची हानी झाली आहे. याच कचराभूमीजवळ शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे मुद्दे भोईर यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, आमदार होण्यापूर्वी सुभाष भोईर ठाणे महापालिकेत सलग पाच वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न किती गंभीर आहे याची त्यांना कल्पना आहे. असे असताना दुसरी व्यवस्था होण्यापूर्वीच दिवा कचराभूमी बंद करण्याची मागणी करून भोईर यांनी सत्ताधारी शिवसेना नेत्यांनाही अडचणीत आणल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.  दिवा येथील कचराभूमी बंद केल्यास ठाण्यात मोठी कचराकोंडी होऊ शकते. असे झाल्यास ठाणेकरांच्या तीव्र नाराजीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागू शकतो. असे असताना भोईर यांनी ही मागणी करून प्रशासनासह शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनाही अडचणीत टाकल्याची चर्चा आता रंगली आहे.

शिळ येथील वनविभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात घनकचऱ्याची विल्हेवाट

शीळ येथील वनविभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखविला असून यामुळे ठाणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिन्याभरात ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.  डायघर येथील घनकचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, या प्रकल्पास विरोध झाल्यामुळे तो रखडला आहे. या पाश्र्वभूमीवर हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत शीळ येथील वन विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी वन विभागाकडे महापालिकेने प्रस्ताव सादर केला होता. त्यास २०१२मध्ये वन विभागाने तत्त्वत: मंजुरीही दिली होती. परंतु राज्याच्या पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे हा प्रस्ताव रखडला होता. गेल्या दोन वर्षांपासून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर या विभागाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.  ही जागा तात्काळ महापालिकेच्या ताब्यात घेण्याविषयीची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण होणार असल्याचे आयुक्त जयस्वाल यांनी सांगितले.