कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकचे पत्रे गेल्या दोन महिन्यापासून रस्त्यावर पडून पादचारी जखमी होत आहेत. स्कायवॉकच्या कोपऱ्यांमध्ये फेरीवाले, पादचाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. हा कचरा अ‍ॅल्युमिनियमच्या पत्र्यावर साचून त्याचा भार अ‍ॅक्रिलिकच्या पत्र्यावर पडतो. कचऱ्याचा हा भार सहन न झाल्याने पत्रे तुटतात, अशी माहिती एका जाणकाराने दिली.
गेल्या दोन महिन्यांपासून स्कॉयवॉकवरील पत्रे तुटून रस्त्यावर, पादचाऱ्यांच्या अंगावर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वर्षांनंतर प्रथम असे पत्रे पडण्याचे प्रकार का वाढले आहेत याची माहिती एका जाणकाराने घेतली. त्या वेळी त्यांना कचरा हे स्कायवॉकवरील पत्रे तुटण्याचे मुख्य कारण असल्याचे समजले.
या तज्ज्ञाने ही माहिती या स्कायवॉकची देखभाल करणाऱ्या ठेकेदार सुनील शहा यांना दिली. शहा यांनी तातडीने स्कायवॉकच्या दुतर्फा साफसफाई करून घेतली. स्कायवॉकवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाले बसायचे. त्यांच्याकडून कागद, कपडे, टाकाऊ माल स्कायवॉकच्या कोपऱ्यांमध्ये दिसणार नाही, अशा पद्धतीने टाकण्यात येत होता. पावसाळा सुरू झाल्यामुळे हा कचरा ओला होऊ लागला. त्याचे वजन असहय़ होऊ लागल्याने तो भार अ‍ॅल्युमिनियमच्या पत्र्यावर पडायचा. हा भार अ‍ॅल्युमिनियमच्या पत्र्याखाली बसवलेल्या अ‍ॅक्रिलिकच्या पत्र्यावर येऊन हे पत्रे तुटत होते.
स्कायवॉकच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याच्या तक्रारी यापूर्वीच प्रशासनाकडे काही तक्रारदारांकडून करण्यात आल्या आहेत. स्कायवॉकसाठी वापरलेल्या अ‍ॅक्रिलिकच्या पट्टय़ा कमी दर्जाच्या आहेत. या पट्टय़ा उत्तम प्रतीच्या असत्या तर त्या पडल्या नसत्या, असे तक्रारदाराकडून सांगण्यात येते. उल्हासनगरच्या ठेकेदाराने स्कायवॉकची उभारणी केली आहे.

Story img Loader