कल्याण-डोंबिवली शहरांच्या स्वच्छतेसाठी आयुक्त ई.रवींद्रन यांनी नवा आराखडा तयार केला आहे. या दोन्ही शहरांचा रेल्वे स्थानके, बस आगार परिसरातील कचरा तीन पाळ्यांमध्ये उचलला जाणार आहे. तर भाजीपाला बाजार भागातील कचरा दोन पाळ्यांमध्ये उचलण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिली.
अनेक वर्षांपासून पालिका हद्दीतील कचरा सकाळ ते दुपारच्या वेळेत उचलून आधारवाडी क्षेपणभूमीवर टाकण्यात येत होता. गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीच्या काळात तसेच निवडणुकांच्या काळात शहरातील कचरा पालिकेकडून दोन पाळ्यांमध्ये उचलण्यात येत होता. यामध्ये निम्मा कचरा उचलून नेण्यात येत असे. सकाळी कचरा उचलला की दुपारपासून पुन्हा कचराकुंडय़ा ओसंडून वाहत होत्या. हा जमा झालेला कचरा दुसऱ्या दिवशी उचलण्यात येत होता.
रेल्वे स्थानक, आगार परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे या भागात सतत सफाई झाली पाहिजे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन या भागात तीन पाळ्यांमध्ये कचरा उचलण्यात येणार आहे. बाजारपेठ, भाजी मंडया भागात दोन पाळ्यांमध्ये व शहराच्या विविध भागांतील कचरा एका पाळीत उचलण्यात येणार आहे. आयुक्त रवींद्रन यांनी शहराची पाहणी करून पहिल्या टप्प्यात कचरा उचलण्याची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी आणि दुपारनंतर पुन्हा त्या ठिकाणी सफाई कामगारांनी, वाहन उचलणाऱ्या वाहनाने फेरी मारली पाहिजे, असा नवा दंडक आयुक्तांनी घातला आहे. यापूर्वी पहाटे कामावर आलेले सफाई कामगार, कचरा वाहनांवरील चालक दुपारी बारा वाजेपर्यंत काम करून नंतर घरी निघून जात होते. सफाई कामगार दिवसभर त्याच्या प्रभागात गणवेशात दिसला पाहिजे, असा फतवा आयुक्तांनी काढला आहे.
महापालिका हद्दीत दररोज तयार होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने येत्या तीस वर्षांचा विचार करून कचरा विल्हेवाट प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. उंबर्डे येथील ३० एकर जागेत येत्या तीस वर्षांचा विचार करून कचरा विल्हेवाट प्रकल्प राबवण्यात येईल. बारावे येथे कचऱ्याची विल्हेवाट व कचऱ्याचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. मांडा-टिटवाळा येथील तीन हेक्टर जमिनीवर कचऱ्यापासून खत प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याशिवाय शहराच्या विविध भागांत दहा ठिकाणी कचऱ्यापासून गॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिली.

Story img Loader