महापालिकेतर्फे स्वच्छता अभियानाचे गोडवे गायले जात असले तरी, शहरातून कचरा नष्ट होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. स. वा. जोशी शाळेच्या रेल्वे मार्गाकडील संरक्षित भिंतीजवळ दररोज परिसरातील कचरा आणून टाकला जातो. हा कचरा दोन दोन दिवस उचलला जात नसल्याने या परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
स. वा. जोशी शाळा आणि दत्त कृपा इमारत यांच्या कोपऱ्यावर (रेल्वे मार्गाकडील दिशा) तीन कचराकुंडय़ा आणून ठेवल्या आहेत. या कुंडय़ांमध्ये इमारतींमधील कचरा गोळा करणारे कर्मचारी कचरा टाकतात. ठाकुर्ली, चोळे भागातील काही चाकरमानी रिक्षाने डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाताना रिक्षातून या कुंडय़ांमध्ये कचरा फेकतात. त्यामुळे कचरा इतरस्त पसरलेला असतो. परिसरातील झाडांच्या तोडलेल्या फांद्या या ऐसपैस मोकळ्या जागेत टाकल्या जातात. कचरा वेचक महिला रेल्वे मार्गालगत आपली दुकाने थाटून कचरा विलग करण्याच्या प्रक्रिया करतात. त्यांचे बांधून ठेवलेले कचऱ्याचे ढीग या भागात असतात. या भागातील हॉटेलमधील नासाडी झालेले अन्न, बाजारातील नाशिवंत भाजीपाला येथील कचराकुंडय़ांमध्ये आणून टाकला जातो. अनेक वेळा हा कचरा वेळेत उचलला जात नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
या भागातील कचराकुंडय़ा अन्यत्र ठेवण्यात याव्यात म्हणून तगादा लावूनही महापालिका दखल घेत नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. आता पालिका निवडणुकीची आचारसंहिता आहे. पालिका कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. या प्रभागाचे प्रभाग अधिकारी आजारी आहेत. ‘फ’ प्रभागाकडे पालिकेचे लक्ष नाही. जोशी शाळेजवळील कचऱ्याची पालिकेत तक्रार केली साहेब नाहीत, कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत, अशी उत्तरे दिली जातात, असे रहिवाशांनी सांगितले.
शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाविषयी सांगितले जाते, तरीही स. वा. जोशी शाळेच्या कोपऱ्यावर काही महिन्यांपासून कचऱ्याने भरलेल्या कुंडय़ा दिसत आहेत. बाजुला मुले मैदानात खेळत असतात. त्या मैदानाबाहेर कचऱ्याचे ढीग हे पालिका अधिकाऱ्यांना सहन होते तरी कसे? नाही शहर स्वच्छ ठेवता येत, तर किमान शाळेचा परिसर तरी स्वच्छ ठेवायला शिका.
– प्रशांत परूळेकर, स्थानिक