ठाणे : संपुर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जागोजागी कचऱ्याचे ढिग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात साचलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण आहेत. तसेच या कचऱ्यामुळे शहरावासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी झाल्याचे सांगत येत्या दोन दिवसांत हा कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
हेही वाचा >>> टोलमुक्तीनंतर आनंदनगर टोलनाक्याची रचना बदलणार
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात ६० टक्के ओला तर, ४० टक्के सुका कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभुमी नसल्यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. परंतु त्यास विरोध झाल्यानंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू होईपर्यंत पालिकेने शहराबाहेर म्हणजेच भांडर्ली येथे तात्पुरती कचराभुमी उभारली होती. डायघर कचरा प्रकल्प सुरु होताच भांडर्ली कचराभुमी बंद करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला डायघर प्रकल्प सुरळीतपणे सुरू होता. परंतु गेल्या काही डायघर प्रकल्प बंद पडल्याने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कचरा गाड्या वागळे इस्टेट येथील सी पी तलाव आणल्या जात होत्या. यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागल्याने त्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. एका वाहनांची दोन ते तीन वेळा फेरी व्हायची पण, वाहनांच्या रांगामुळे एकच फेरी होऊ लागली. दिवसाच्या सुमारे ५० ते ६० टक्के फेऱ्या रद्द होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे कचरा ओला होऊन तो कुजत आहे. या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कचऱ्यामुळे शहरावासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> माजी प्र-कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांचे निधन
चौकट काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्याने कचराकोंडी झाली आहे. सी पी तलाव येथे कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांच्या रांगा वाढल्या. या वाहनकोंडीमुळे कचरा उचलणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्या. त्यामुळे कचरा साचल्याचे दिसून येत आहे. परंतु डायघर प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला असून शहरातील कचरा आता उचलण्याचे काम सूरू झाले आहे. जादा वाहने आणि मनुष्यबळाचा वापर करून कचरा उचलण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.