लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – नवरात्रोत्सवानिमित्त कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मुख्य वर्दळीच्या, अंतर्गत गल्लींमधील रस्त्यावर नवरात्रोत्सवासाठी मंडप टाकणाऱ्या मंडळांनी दसरा झाल्यानंतर मंडपाच्या ठिकाणची कचरा, माती कायम ठेवल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे येत आहेत.
नवरात्रोत्सवासाठी पालिकेकडून परवानगी घेतल्यानंतर मंडप टाकल्यापासून ते काढून घेईपर्यंत त्याठिकाणी स्वच्छता राहिल याची काळजी घेण्याची जबाबदारी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळाची असते. नवरात्रोत्सव होऊन देवी विसर्जन झाल्यानंतर मंड़पाचे लाकडी सामान ठेकेदाराने काढून नेले आहे. या मंडपाखालील माती, कचरा, प्लास्टिकचे कप, पिशव्या कायम असल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीतील सागर्लीमधील जीमखाना रस्त्यावर धुळीचे लोट; खडडे, खराब रस्त्यांमुळे प्रवासी हैराण
अनेक ठिकाणी मंडप बांधण्यासाठी असलेल्या कापडी दोऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांखाली येऊन त्या दूरवर चाकाला, वाहनाच्या यंत्राला अडकून दूरवर जात आहेत. मंडपाखालील कचरा वारा, वाहनांच्या वर्दळीमुळे इतर पसरत आहे.
नवरात्रोत्सव झाला की अनेक मंडळाचे कार्यकर्ते मंडप बांधला होता त्याठिकाणी फिरकत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पालिकेने नवरात्रोत्सव मंड़पाच्या ठिकाणी माती, कचऱ्या घाण करणाऱ्या, ती न उचलणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. अनेक मंडळांनी मंडप परिसरात जाहिरातील लावल्या होत्या. त्यामुळे त्या भागाचे विद्रुपीकरण झाले आहे. या जाहिराती मंडळांनी काढून घेण्याच्या सूचना प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी संबंधित मंडळांना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आणखी वाचा-ठाणे: अधिकारी- कर्मचारी तीव्र कुपोषित मुलांना घेणार दत्तक
डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात अनेक मंडळांनी रस्त्यावर नवरात्रोत्सव उत्सव आयोजित केले होते. त्याठिकाणीही कचरा पडल्याचे चित्र आहे. घनकचरा विभाग आणि प्रभागातील कर्मचाऱ्यांनी नवरात्रोत्सव मंडपाच्या ठिकाणी कचरा करणाऱ्या मंडळांची माहिती घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.