घरातील भिंत म्हटली की त्यावर एखादे भले मोठे घडय़ाळ, छायाचित्र, चित्र किंवा प्रमाणपत्रांच्या तसबिरींची गर्दी आणि प्लास्टिक झुंबराची कलाकुसर अशी सजावट दिसते. मात्र, ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली प्रदर्शनातून अंतर्गत सजावटीचा हा कल आता बदलू लागल्याचे दिसून आले. कृत्रिम सजावटीची जागा आता खऱ्याखुऱ्या फुलांनी आणि शोभिवंत झाडांनी घेण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी घराबाहेरील भिंतीवर वेलीची कलाकुसर आता बाल्कनी आणि घराच्या आतील भिंतीवर दिसू लागली आहे. मोठय़ा औद्योगिक संस्था, गृहसंकुलांमध्ये दिसणारे शोभिवंत बागकाम आता घराघरात आवडीचा विषय बनू लागला आहे.
घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आणि उन्हाळ्यात थंड वातावरणाच्या अनुभवासाठी भिंतीवरच्या बागकामाचा हा ‘ट्रेंड’ भलताच लोकप्रिय होऊ लागला आहे. या अंतर्गत सजावटीची परिणामकता कायम राहावी यासाठी घराघरातून वेगवेगळे प्रयत्न होताना दिसत आहे. अशा प्रकारची घरातील अंतर्गत भितींवरील बाग कशी साकारता येईल, याची माहिती मिळविण्याचा सर्वाधिक प्रयत्न महापालिकेतील उद्यान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बागकाम म्हटले की, मोकळ्या सपाट जागेवर मातीचे वाफे तयार करून त्यामध्ये रोपांची लागवड किंवा शहरात गॅलरीच्या कुंडय़ांमध्ये, छतावर केली जाणारी लागवड इतका मर्यादित प्रकाराचा त्यामध्ये समावेश होत होता. ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षवल्ली प्रदर्शनाच्या निमित्ताने या पारंपरिक संकल्पनेला छेद मिळाला. भिंतीवरील बागकाम ही वेगळी संकल्पना पुण्यातील संजय नर्सरीच्या प्रदर्शनीवरून पुढे आली. पुण्यात कार्यरत असलेल्या या नर्सरीच्या व्यवस्थापनाने या विषयाचा विस्तृत अभ्यास करून भिंतीवरील उभ्या बागकामाचे नवे ट्रेंड या प्रदर्शनामध्ये मांडले होते. प्लास्टिकच्या चौकोनी आकाराच्या कुंडय़ा एकमेकांमध्ये संलग्न करून त्यांची एक भिंत तयार केली जाते. घरातील किंवा बाल्कनीतील भिंतीला जोडून ही प्लास्टिकच्या कुंडय़ांची भिंत उभी करता येते. त्यामध्ये माती, खते आणि बियाणांची पेरणी करून ते वाढवले जातात. या आकर्षक बागेमुळे घरातील सौंदर्य खुलते, त्याशिवाय घरातील वातावरणही थंड राहते.

उभ्या बागेची गरज
व्यवसायिक कार्यालये, रुग्णालय, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, मॉलमध्ये भिंतीवरील बाग ही काही नवी कल्पना नाही. लग्न समारंभ, पार्टी यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सुशोभीकरण आणि सौंदर्य वाढवण्यासाठी अशी बाग लोकांचे लक्ष वेधणारी ठरते. शिवाय निसर्गाची भेट देण्यासाठी आणि वैभवाचे प्रतीक म्हणूनही बाग लोकांना उपयुक्त ठरते. उभी बाग हलवली जाऊ शकते. पांढरे, काळे, हिरवे, पिवळे, लाल, निळे आणि गुलाबी रंगाच्या वनस्पती आणि प्लास्टिक कुंडय़ा यासाठी या प्रदर्शनात उपलब्ध होत्या. घरातील अपुऱ्या जागेत, गच्चीवर, सज्जात, खिडक्यांमध्ये लोक छोटय़ा बागा करत असतात. कुंडय़ांमध्ये वा लाकडी खोक्यांमध्ये खतवलेली माती भरून त्यात आवडती रोपे-फुलझाडे लावून आपली बागकामाची हौस भागवत असतात. त्यांच्यासाठी ही बाग साकारणे सोपे जाईल, अशी माहिती संजय नर्सरीजचे प्रीतम चांचड यांनी दिली. कुंडय़ांचे विविध आकार, प्रकार हेही कलात्मक बागकामाचा महत्त्वाचा घटक आहे. मातीच्या, वेताच्या, काचेच्या नानाविध प्रकारच्या पारंपरिक कुंडय़ांपेक्षा या कुंडय़ा अधिक लोकप्रिय होत असल्याचे वृक्षवल्ली प्रदर्शनाच्या निमित्ताने दिसून आल्याचे महापालिकेच्या आयोजकांनी सांगितले.

Story img Loader