ठाणे– ठाणेकरांचा प्रवास गारेगार आणि सुखकर व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने परिवहन विभागाच्या खात्यात नव्या वातानुकूलित बस गाड्या आणल्या होत्या. परंतू, ठाणे शहरासाठी सुरु केलेल्या गारेगार बस शहरात कमी आणि लांबच्या पल्ल्यावर जास्त सोडल्या जात असल्याचे समोर आले आहे. सध्या उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या नागरिकाला वाटते की, वातानुकूलित बसने प्रवास करावा. मात्र, बस थांब्यावर कितीही वाट पाहिली तरी, वातानुकूलित बस येत नसल्याच्या तक्रारी काही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
ठाणे शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या टीएमटी बस शहराच्या विविध मार्गांसह इतर शहरांमध्येही चालतात. ठाणे पश्चिम सॅटीस पुलावरुन घोडबंदर, बाळकूम, कोलशेत, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, खोपट असे शहरांतर्गत विविध मार्गांसह बोरिवली मिरा-भाईंदर अशा शहराबाहेर देखील टीएमटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तर, कोपरी आगारातूनही विविध मार्गावर टीएमटी बस जातात. टीएमटी बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी महापालिकेने टीएमटीच्या खात्यात ६६ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल केल्या. ठाणेकर नागरिकांचा हा प्रवास अधिक सुखकर आणि गारेगार व्हावा याउद्देशाने या बस दाखल करण्यात आल्या होत्या. सुरुवातीली काही दिवस शहराच्या विविध मार्गांवर या बस गाड्यांचे विभाजन करण्यात आले होते. त्यामुळे विविध भागातील नागरिकांना वातानुकूलित बसने प्रवास करण्याचा एक वेगळा आनंद मिळत होता. मात्र, सद्यस्थितीला शहरात या वातानुकूलित बस गाड्यांची संख्या रोडावलेली पाहायला मिळत आहे. ६६ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्यांपैकी ५० बस गाड्या या लांबच्या पल्ल्यावर चालविल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे स्थानक पश्चिम ते मिरारोड पूर्व, ठाणे स्थानक पश्चिम ते बोरिवली स्थानक पूर्व, ठाणे स्थानक पूर्व ते बोरिवली स्थानक पूर्व, भारत गिअर्स / काळसेकर महाविद्यालय ते मिरारोड स्थानक पूर्व, मुलुंड स्थानक पश्चिम ते ब्रह्मांड/धर्माचापाडा, हिरानंदानी ते बीकेसी, मुलुंड स्थानक पश्चिम ते मिरारोड स्थानक पूर्व या मार्गांवर सर्वाधिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्या धावतात. तर, उर्वरित १६ बसगाड्या या ठाणे स्थानक पूर्व ते हिरानंदानी रोडास सोसायटी, वागळे सर्कल (नेपच्युन) ते लोढा कॉम्प्लेक्स, वागळे आगार ते पारसिक नगर आणि लोकमान्यनगर ते खारीगाव या मार्गांवर धावतात. शहरातील बहुतांश मार्गावर वातानुकूलित इलेक्ट्रिक बस धावत नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे प्रत्येकाला वातानुकूलित बसने प्रवास करावा असे वाटते. परंतू, अनेक ठिकाणी या बस पोहोचत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
टीएमटी प्रशासनाचा दावा…
वातानुकूलित बस गाड्या लांबच्या पल्ल्यावर जरी सोडत असलो तरी, त्यामार्गावर प्रवास करताना शहरातील काही बस थांबे लागतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना या बसने प्रवास करणे शक्य आहे. काही तांत्रिक बाबींमुळे या बस लांबच्या पल्ल्यावर सर्वाधिक सोडल्या जात आहेत, अशी माहिती ठाणे परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसेच येत्या काळात शहराअंतर्गत काही मार्गांवर या बस चालविण्याचे नियोजन आखले जाईल असेही त्यांनी सांगितले.