किरकोळ बाजारात लसूण २०० रुपये किलो ; साठेबाजीमुळे दरवाढ झाल्याचा संशय
औषधी तसेच मसाल्याच्या पदार्थामध्ये उपयोगी ठरणारा लसूण आता तूरडाळीपेक्षा महागला आहे. ठाण्याच्या किरकोळ बाजारात उत्तम प्रतीच्या लसणाची किंमत थेट २०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. दोन महिन्यांपूर्वी बाजारपेठेत १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत असलेल्या लसणाचे दर अचानक १८० ते २०० रुपयांवर पोहोचल्याने किरकोळ व्यापारी तसेच ग्राहकांचेही डोळे विस्फारले असून हा साठेबाजीचा तर परिणाम नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
‘मध्य प्रदेश, जामनगर, गुजरात तसेच महाराष्ट्रातील पुणे, नाशिक यांसारख्या जिल्ह्य़ांमधून मुंबईच्या घाऊक बाजारांमध्ये होणारी लसणाची आवक काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे,’ अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शामकांत चौधरी यांनी दिली. साधारणपणे, ऑक्टोबर महिन्यात लसणाची लागवड केली जाते. त्यानंतर चार ते पाच महिन्यांनंतर उत्पादन येण्यास सुरुवात होते. मात्र आलेले उत्पादन पूर्णत: विक्रीसाठी तयार नसल्याने ओला लसूण साठवणे शक्य होत नाही. बाजार समितीत शेतकऱ्यांकडील लसूण विक्रीसाठी येताच कमी दरात खरेदी करण्याची साखळी रचली जाते. परंतु त्यानंतर पाच ते सहा महिने उलटले की लसणाचे भाव गगनाला भिडतात. या सर्व घडामोडींत ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागते. अलीकडेच तूरडाळ महागाईने देशात राजकारण सुरू असताना आता लसूण १८० रुपयांच्या घरात पोहोचल्याने ग्राहकांना ही फोडणी भलतीच महाग ठरू लागली आहे. किरकोळ बाजारात उत्तम प्रतीच्या सुक्या लसणाची किंमत थेट २०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
साठेबाजीची शक्यता
लसणाचे दर वाढण्यामागे साठेबाजी हे एक कारण असल्याची कुजबुज किरकोळ विक्रेत्यांमध्ये आहे. अवघ्या दीड ते दोन महिन्यांत लसणाचे दर दुप्पट कसे झाले, असा सवालही उपस्थित होत आहे. लसूण उत्पादनाचा कालावधी सध्या संपुष्टात आला आहे. तर शेतकऱ्यांकडेही हल्ली लसूण नाही. ही परिस्थिती हेरून व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरू केल्याचा सूर उमटू लागला आहे. ‘महिनाभरात अचानक लसणाचे दर वधारल्याने ते विकताना कसरत होत आहे. लसणाचा भाव वधारल्यामुळे काही दिवसांनी ग्राहक याकडे पाठ फिरवतील,’ अशी चिंता किरकोळ भाजीविक्रेते रवी कुर्डेकर यांनी बोलताना व्यक्त केली.