गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा वयोवृद्ध, आइस्क्रीम हा सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. कोणत्याही ऋतूत आइस्क्रीम खाणे पसंत केले जाते. पूर्वी आइस्क्रीममध्ये फारशी विविधता नव्हती. आता मात्र निरनिराळ्या स्वादांचे आइस्क्रीम उपलब्ध आहेत. त्यामुळे तनामनाला ‘गारवा’ देणाऱ्या या आइस्क्रीमच्या नवनव्या अवतारांच्या शोधात खवय्ये असतात. सध्या पावसाळा संपून ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. थंडीची चाहूल लागली असली तरी खवय्यांना आइस्क्रीम व्यज्र्य नाही. त्यामुळे आइस्क्रीम पार्लरभोवती खवय्यांची मोठी गर्दी दिसू लागली आहे.

नावातच ‘गारवा’ असलेले आइस्क्रीम बदलापूरमध्ये खूप लोकप्रिय आहे. वेळोवेळी चवींमध्ये बदल करीत सातत्याने नावीन्यपूर्ण देणे ही ‘गारवा’ची खासियत आहे. त्यामुळे बदलापूर आणि गारवा आइस्क्रीम हे समीकरण बनले आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांना यजमान बदलापूरकर ‘गारवा’ची पार्टी देतात. नोकरीत मन लागत नसल्याने २०१४ मध्ये अंजय गाली आणि त्यांचे सहकारी नीलेश मिसाळ, समीर आणि शाम शानबाग यांनी गारवा आइस्क्रीम पार्लर सुरू केले. नीलेश मिसाळ यांना हॉटेल व्यवसायाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ग्राहकांना नवनवीन देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करीत असल्याची माहिती अंजय गाली यांनी दिली. ‘गारवा’मध्ये  आइस्क्रीमप्रेमींना ‘गडबड’, ‘संडेज्’ आणि ‘सिजलिंग ब्राऊनी’ असे गारवा स्पेशल प्रकार खायला मिळतात. आइस्क्रीमसोबतच फालुदा, गोळा, मस्तानी आणि ज्युस तसेच मिल्कशेकमधील अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. ‘संडेज्’ ही गारवाची खासियत आहे. क्रीम, टॉफिंग, जेली आणि ड्रायफ्रूटच्या मदतीने सजावट करून संडेज् तयार केले जाते. वैविध्यपूर्ण निर्मिती आणि सजावटीमुळे ‘संडेज्’ला सर्वाधिक मागणी असल्याचे अंजय गाली सांगतात. त्याचसोबत गरम चॉकलेटमध्ये थंडगार आइस्क्रीम टाकून सिजलिंग ब्राऊनी तयार केली जाते. गरम पदार्थात थंड आइस्क्रीम हा वेगळाच प्रकार असल्याने यालाही चांगली मागणी असल्याचे ते सांगतात. त्याचसोबत मिक्स आइस्क्रीम आणि ताज्या फळांच्या सजावटीने ‘गडबड’ तयार केली जाते. त्यालाही खवय्यांची चांगली पसंती आहे. ‘गारवा’ने आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगळे प्रकार देण्याचा प्रयत्न केला आहे. केक आइस्क्रीम, स्ट्रॉबेरी क्रीम, मलाई फालुदा असे अनेक प्रकार येथे मिळतात. फालुद्याचे काही प्रकार फक्त काही कालावधींसाठी असतात. रबडी टाकून तयार केलेला मलाई फालुदा हाही एक वेगळा प्रकार. त्यालाही ग्राहकांची चांगली पसंती मिळते. दुकानात सात ते दहा जण बसण्याची व्यवस्था आहे. तसेच येथे २० रुपयांच्या गोळ्यापासून १७० रुपयांच्या सिजलिंग ब्राऊनीपर्यंतचे प्रकार खायला मिळतात. सध्या दुकानात दोन कर्मचारी आणि गाली स्वत: असतात. येथे आलेल्या ग्राहकासोबत सेल्फी काढून त्यांचा कोलाज दुकानाच्या प्रवेशाच्या ठिकाणी लावण्याची पद्धत आहेत. त्यामुळे येथे येणारा ग्राहक हा आपल्या जुन्या आठवणी पाहून दुसऱ्यांना त्याविषयी सांगत असतो. त्यातून एक वेगळ्या प्रकारचे नाते तयार झाल्याचे अंजय गाली सांगतात.

चौथी मुंबई अशी ओळख बनू पाहणाऱ्या बदलापूरची जीवनशैलीही आता बदलू लागली आहे. सध्या शहरात जेवणानंतर फेरफटका मारत आइस्क्रीम खाणे लोक पसंत करू लागले आहेत. त्यामुळे सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत विविध वयोगटांतील खवय्यांची येथे वर्दळ असते. शनिवारी आणि रविवारी रात्री उशिरापर्यंत आइस्क्रीमप्रेमी येत असतात, असे नीलेश मिसाळ यांनी सांगितले. पावसाळ्याचा काळ जरा कठीण असतो. इतर वेळी मात्र ग्राहकांची सदैव गर्दी असते. सध्या शहरात आमच्या दोन शाखा आहेत. आणखी काही शाखा सुरू करण्याची आमची इच्छा आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. सातत्याने नवनवीन देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ग्राहकही त्याला चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे आमचेही मनोबल वाढते आहे, असे अंजय गाली सांगतात.

गारवा,

  • कॉटनकिंगशेजारी, रेल्वे स्थानकाजवळ, बदलापूर (पूर्व).
  • सकाळी ११ ते रात्री १२ पर्यंत दररोज

Story img Loader