ठाणे : यशोधनगर भागातील शेकडो ग्राहकांचा गॅस पुरवठा गेले चार तासांपासून खंडीत झाला आहे. ऐन दुपारी स्वयंपाक करण्याच्या वेळी गॅस पुरवठा खंडीत झाल्याने गृहिणींमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. यामुळे अनेकांना बाहेरुन जेवण मागवावे लागले.

वागळे इस्टेट भागातील यशोधननगर परिसरातील बहुतांश इमारतींचा गॅस पुरवठा दुपारी १२ वाजताच्या सुमारास ठप्प झाला. कोणतीही पूर्व सूचना न देता गॅस पुरवठा खंडित झाल्याने या भागातील २०० हून अधिक कुटूंबांना याचा फटका बसला. ऐन दुपारच्या वेळेस गॅस पुरवठा खंडित झाल्याने स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला. अनेकांनी तात्काळ महानगर गॅस च्या कार्य़ालयात संपर्क साधला, त्यावेळी लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळित करण्यात येईल असे कंपनीकडून त्यांना सांगण्यात आले. परंतू, चार तास उलटून गेले तरी, गॅस पुरवठा सुरळित झालेला नाही.

गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे अनेकांना दुपारचे जेवण बाहेरून मागवण्याची वेळ आली. सायंकाळपर्यंत गॅस पुरवठा सुरळित झाला नाही तर, पुन्हा रात्रीचे जेवण बाहेरुन मागवावे लागणार त्यामुळे पून्हा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागेल, अशी संतापजनक प्रतिक्रिया या भागातील एका नागरिकाने दिली.