ठाणे : घोडबंदर परिसरात मंगळवारी दुपारी एका खाजगी कंपनीकडून सुरु असलेल्या खोदकामादरम्यान महानगर कंपनीची गॅस वाहीनी फुटली. यामुळे कासारवडवली, आनंदनगर परिसरातील साडेपाचशेहून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत झाला. दुपारी ४ वाजता खंडीत झालेला गॅस पुरवठा रात्री १२ वाजता म्हणजेच आठ तासानंतर पुर्ववत झाल्याने नागरिकांना रात्रीच्या जेवणासाठी हाॅटेलचा आधार घ्यावा लागला. यामुळे परिसरातील हाॅटेलमध्ये गर्दी होण्याबरोबरच ऑनलाईनद्वारे हाॅटेलमधून खाद्य पदार्थ मागविण्यास सुरूवात केल्याने खाद्य पदार्थ वाहतूक करणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या परिसरातील संकुलांमध्ये वाढल्याचे चित्र दिसून आले.

घोडबंदर भागातील साईनाथ नगर परिसरात मंगळवारी खासगी कंपनीकडून खोदकाम सुरु होते. या कामा दरम्यान, दुपारी ४ वाजता महानगर गॅस कंपनीच्या गॅस वाहिनीला धक्का बसून ती फुटली. या घटनेची माहिती मिळताच, महानगर गॅस कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन गॅस पुरवठा वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. ही वाहीनी फुटल्यामुळे घोडबंदर भागातील कासारवडवली, साईनाथ नगर, आनंद नगर यासह अन्य परिसरातील साडेपाचशे हून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा ठप्प झाला होता. या सर्व ग्राहकांना महानगर कंपनीने मोबाईलद्वारे संदेश पाठवून रात्री ११ वाजेपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत होईल, असे कळविले होते.

ऐन सायंकाळच्या वेळी गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे रात्रीचा स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न गृहिनींसमोर निर्माण झाला होता. यामुळे रात्रीच्या जेवणासाठी अनेकांनी परिसरातील हाॅटेलचा आधार घेतला. तर, काहींनी ऑनलाईनद्वारे हाॅटेलमधून घरीच जेवण मागविले होते. त्यामुळे खाद्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची या भागातील संकुलांच्या परिसरात फेऱ्या वाढल्याचे चित्र दिसून आले. अनेकजण गॅस पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहात होते. परंतु उशीरापर्यंत पुरवठा पुर्ववत होत नसल्यामुळे त्यांनीही ऑनलाईनद्वारे हाॅटेलमधून जेवण मागविण्याचा निर्णय घेतला. रात्री ११ वाजता महानगर कंपनीने गॅस पुरवठा सुरळीत झाल्याचे संदेश ग्राहकांना पाठविले. मात्र काही संकुलांचा गॅस पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. या संकुलातील रहिवाशांनी तक्रार करताच कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेऊन पाहाणी सुरू केली. दरम्यान, सकाळपर्यंत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाहीतर जेवण करायचे कसे, असा प्रश्न महिलांपुढे होता. परंतु कर्मचाऱ्यांनी तांत्रिक दुरुस्ती करत रात्री १२ वाजेनंतर गॅस पुरवठा सुरळीत झाल्याने महिलांचा जीव भांड्यात पडला.