ठाणे : स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी गावदेवी मैदानात उभारण्यात आलेल्या भूमिगत वाहनतळाचे काम नुकतेच पुर्ण झालेले असून याशिवाय, वाहनतळाचा ठेका देण्यासाठी काढलेल्या निविदेतून ठेकेदार निवडण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याचे काम शिल्लक आहे. परंतु कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुक आचारसंहितेमुळे ही प्रक्रीया रखडण्याबरोबरच वाहनतळाचे लोकार्पणही लांबणीवर पडल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे नागरिक रस्त्याकडेला वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर व्हावी यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यातूनच पालिकेने स्मार्ट सिटी योजनेतंर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी करण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. हे काम नुकतेच पुर्ण झालेले आहे. वाहनतळावरील मैदानही पुवर्वत करण्याबरोबरच याठिकाणी सुशोभिकरणाची कामे करण्यात आली आहेत. हे वाहनतळ ४,३३० चौरस मीटरचे असून त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
लोकार्पण झाल्यानंतर वाहनतळ सुरू करण्यास उशीर होऊ नये म्हणून पालिकेने वाहनतळाचा ठेका देण्यासाठी निविदा काढली होती. त्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. प्राप्त झालेल्या निविदेतून ठेकेदार निवडण्याची प्रक्रीया केवळ शिल्लक आहे. परंतु कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणुकीचा फटका या प्रक्रीयेला बसला आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारी रोजी मतदान होणार असून २ फेेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुक आचारसंहितेमुळे पालिकेला वाहनतळासाठी ठेकेदार निवडण्याची प्रक्रीया करणे शक्य होत नसून त्याचबरोबर आचारसंहितेच्या काळात कोणत्याही कामांचे लोकार्पण करता येत नाहीत. त्यामुळे वाहनतळाच्या लोकार्पण लांबणीवर पडले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापुर्वीच वाहनतळाच्या पार्किंगचे दर निश्चित केले असून त्याप्रमाणे पार्किंगचे दर आकारले जाणार आहेत. तसेच जो ठेकेदार उत्पन्नातील जास्त वाटा महापालिकेला देईल, त्याला कामाचा ठेका दिला जाणार आहे. यामुळे पालिकेला उत्पन्न मिळणार आहे. तसेच वाहनतळातील विद्युत देयके, देखभाल व दुरुस्ती अशी कामे ठेकेदाराला करावी लागणार आहेत, असे पालिका सूत्रांनी सांगितले.