गझल हा एक असा काव्य/गीत प्रकार आहे, जो अगदी रूक्ष माणसालाही काही क्षणांसाठी भावनेच्या सागरात विहार करायला लावतो. आशयपूर्ण गझल तर मंद सुरावटींनिशी हृदयात अल्लद प्रवेश करते आणि मनावर राज्य गाजवते. गझलेतील शब्दांना जेव्हा शास्त्रशुद्ध गायकीचा स्वर लाभतो, तेव्हा त्या आशयावर आणखी झिलई चढते. हाच अनुभव ठाण्यातील सहयोग मंदिरात जमलेल्या रसिकांनी शनिवारी घेतला.
ठाणे म्युझिक फोरमच्या युनिटी या संस्थेतर्फे शास्त्रीय संगीतात आपले आयुष्य वेचणाऱ्या ठाण्यातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. प्रत्येक चांदणी प्रत्येक दिवसाला स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी प्रकाश घेऊन येते. मग कधी ती चांदणी मध्येच चमकणे पसंत करते, तर कधी आपल्यापरीने ती चंद्रालाही खूश ठेवण्याचा प्रयत्न करते. अगदी त्याचप्रमाणे ठाण्यातील या शास्त्रीय संगीतातील प्रत्येक कलाकाराने रसिकांना रिझवण्यासाठी आपल्या सुरांबरोबरच गझलरूपी काव्याचा प्रकाश पाडून या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतला होता. एरवी तबल्यावर आपल्या बोटांची जादू दाखविणाऱ्या किशोर पांडे यांनी ‘काश ऐसा कोई मन होता मेरे खांदे पे तेरा सर होता’ ही गझल गाऊन आपल्या गळ्यातही जादू असल्याचे दाखवून देत रसिकांना अचंबित केले. त्यानंतर रसिक स्वत:च्याच आठवणीत रमले, तर शहनाई फक्त लग्नकार्यातच वाजवण्याचे वाद्य नसून ‘आवारगी’ आणि ‘चुपके चुपके’ या गझल शहनाईवर सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. दीपिका भिडे हिने गायलेल्या ‘तुम्हे बस याद करके हम हजारो को भुला बैठे’ ही गझल सभागृहात रंगली, तर विभावरी बांधवकर यांनी गायलेल्या ‘आज जाने की जिद ना करो’ या गझलने कार्यक्रम संपण्याच्या वेळेस रसिकांच्या मनात निर्माण झालेल्या भावनेचेच प्रतिबिंब दाखवले. अनघा पेंडसे यांनी ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ ही गझल, तर उत्तरा चौसाळकर यांनी ‘मेरे दु:ख की तबा करे कोई’ तसेच वेदश्री ओक यांनी ‘केव्हा तरी पहाटे’ या गझल सादर करून रसिकांना सुखद अनुभूतीच्या वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवले. यती भागवत यांनी तबल्याची साथ दिली, तर संवादिनीची साथ अनंत जोशी यांनी दिली. धनश्री लेले यांनी निवेदन केले.

शब्दांनीच आयुष्य उलगडले..
कोंदण्यातील हिऱ्याला एकत्र करून कारागीर सुंदर नक्षी तयार करतो आणि त्या दागिन्यांमधील सुंदर नक्षी आपले लक्ष वेधते. तसेच संवादाचे असते. भाषा तीच मात्र भाषेला शब्दांमुळे गोडवा प्राप्त होतो. हे शब्द पृथ्वीवरील नवरसाशी मिसळावे तसे एकमेकांमध्ये मिसळतात. एक शब्द दुसऱ्या शब्दाला भेटून आलिंगन देत आपली एकमेकांशी जुनीच ओळख असून आज एकाच पेनाच्या शाईमधून एकाच कागदावर आपण स्थिरावलो असल्याचा आनंद हे शब्दही संवादातूनच व्यक्त करतात. हा संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम माध्यम असतो लेखक किंवा कवी. याचा नेमका प्रत्यय कल्याणकर रसिकांनी चंद्रशेखर गोखले यांच्या सर्व ब्राह्मण कट्टय़ातर्फे आयोजित केलेल्या ‘धुळवड शब्दांची’ या कार्यक्रमात घेतला.
प्रत्येकाच्या संवेदनाचा कोपरा जागा करणे हे लेखक-कवीचे काम आहे. सरस्वती प्रसन्न असल्यावर रसिकांचे मन जिंकणे अतिशय सोपे असते, असे म्हणतच उमा गोखले आणि चंद्रशेखर गोखले यांनी संसारात आणि समाजात माणसांशी साथसोबत करताना आलेल्या अडचणींना कसे तोंड द्यायचे हे आपल्या चारोळ्यातून तसेच गप्पांमधून अगदी सहज उलगडले. या वेळी त्यांनी ‘पाण्याचे वागणे किती विसंगत पोहणाऱ्याला बुडवून मेलेल्याला ठेवते तरंगत’ ही चारोळी आपल्या भाचीने हातात धरलेली बाहुली पाण्यात पडली आणि ती पाण्यावर तरंगू लागली ते बघून सुचल्याचे सांगितले. एखाद्या फुलांचा सुगंध घेतल्यानंतर आपण आठवणीत रमतो. निसर्गातील या छोटय़ा गोष्टीही अगदी सहजच आपल्याला बरेच काही शिकवितात. या वेळी त्यांनी आपल्या पाल्याला जे काही करायचे आहे ते करू द्या. त्यावर कुठल्याही एका शिक्षणाचे बंधन लादू नका सांगताना आपण अभ्यासात ढ असल्याचे सांगितले. आई-वडिलांना माझी चिंता असायची, त्यामुळे मला वडिलांनी घराबाहेर काढले होते. मात्र मी आज रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे इथवर पोहोचल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यानंतर ‘माय-लेक’ ही कथा उमा यांनी वाचून दाखविली. आई आणि मुलाच्या प्रेमाची कथा वाचताना रसिक प्रेक्षकांसह स्वत: उमा गोखले यांनाही अश्रू आवरले नाहीत. या वेळी उमा यांनी ‘जाळीमंधी पिकली करवंद’, ‘संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे’ही गाणी गायली.