ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेले गीतरामायण शनिवारी संध्याकाळी कल्याणमध्ये सादर झाले आणि या कलाकृतीच्या श्रवणाने अवघे कल्याणकर मंत्रमुग्ध झाले. शहरातील प्रसिद्ध काळा तलावाकाठी रंगलेल्या या संगीत सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
मराठी संगीतातील एक उत्तम कलाकृती समजल्या जाणाऱ्या ‘गीतरामायणा’ने नुकतेच साठाव्या वर्षांत पदार्पण केले. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणमध्ये करण्यात आले होते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या गीतरामायणाचे गायन श्रीधर फडके यांनी केले. त्यांचे गोड, मधुर स्वरातील सादरीकरण रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे होते.
‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती,’ या गाण्याने गीतरामायणाचा श्रीगणेशा झाला, तर ‘राम जन्मला ग सखे’ या गाण्याला श्रोत्यांकडून दाद मिळाली. ‘दशरथा घे हे ज्येष्ठ तुझा पुत्र’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘माता न तू वैरिणी’, ‘पराधीन आहे जगती’, अशा विविध गीतांनी प्रेक्षकांची मने रामकथेत गुंतत गेली.
गीतरामायणाचे सर्व श्रेय गदिमा आणि बाबूजींचे आहे. मी केवळ त्यांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करीत आहे, असे श्रीधर फडके या वेळी म्हणाले.
खरे तर गीतरामायण हा चित्रपटच असून तो ५६ गीतांमध्ये मांडण्यात आला आहे. प्रत्येक गीत गदिमा आणि बाबूजी यांनी आपल्या शब्दकलेतून जिवंत केले आहे. त्यामुळेच शब्दांचा आणि स्वरांचा सुरेख संगम असणारे हे काव्य अजरामर आहे, असेही ते म्हणाले.
गीतरामायण हे अलौकिक काव्य असून परमेश्वराने दिलेली ही देणगीच आहे. या काव्यावर आजही रसिक भरभरून प्रेम करत आहेत व यातूनच पुढच्या पिढीत गदिमा, बाबूजी तयार व्हायला हवेत, अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. संगीत क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या मंदार सोमण यांना या वेळी गौरविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा