शहापूर : शहापूर उपजिल्हारुग्णालयात एका नऊ वर्षीय मुलाच्या पायाच्या शास्त्रक्रियेबरोबरच त्याच्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया पालकांच्या परवानगीशिवाय करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे रुग्णाच्या आई – वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, याबाबत नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चौकशी समितीचा अहवाल गुलदस्त्यात आहे.
शहापुर तालुक्यातील सावरोली येथील नऊ वर्षीय आदिवासी मुलाच्या पायाला संसर्ग (इन्फेक्शन) झाले होते. त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी १५ जून रोजी त्याला शहापूर उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १७ जूनला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करताना संबंधित डॉक्टरने पायाची शस्त्रक्रिया करण्याबरोबरच गुप्तांगाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. या गुप्तांगाची शस्त्रक्रिया करण्याबाबत संबंधित डॉक्टरने कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना किंवा आमची परवानगी घेतली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा – राबणाऱ्यांसाठी हक्काच्या, सुरक्षित घरांचा ठाणे पॅटर्न ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’
हेही वाचा – ठाणे : लक्ष्य शाळकरी मुले!
या शस्त्रक्रियेमुळे मुलाच्या आई – वडिलांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत चौकशीची मागणी केली आहे. तद्नंतर याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने दोन दिवसांपूर्वी शहापूर उपजिल्हारुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली असून त्याबाबतचा अहवाल गुलदस्त्यात आहे. चौकशी अहवालानंतर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात डॉ. अशिलाक शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी डॉ. अशिलाक शिंदे यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने ते अंत्यविधीसाठी गावी गेल्याचे सांगितले.