आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला चालकांना डावलून सर्रास वापर; आरटीओ, पोलीसही हतबल

ठाणे शहरातील महिला प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या अबोली रिक्षा योजनेत पुरुष रिक्षाचालकांनी अतिक्रमण सुरू केले असून खास महिला चालकांसाठी दिलेले परवाने त्यामुळे दिखाऊपणाचा फार्सच ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे. महिलांच्या नावे खरेदी केलेल्या काही अबोली रिक्षा चक्क पुरुष चालकांमार्फत चालविल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र सध्या शहरात दिसत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसर आणि शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये हा प्रकार सर्रासपणे सुरू असून आरटीओ आणि वाहतूक पोलीस या अतिक्रमणापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरातील   रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्याच्या उद्देशाने महिला चालक असलेल्या अबोली रिक्षा शहरात चालवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष पुढाकार घेतला. शहरातील महिला प्रवाशांचे सारथ्य करण्यासाठी उत्सुक ८० ते ९० महिलांना रिक्षाचे परवाने वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. मात्र या रिक्षा महिला रिक्षाचालकांनीच चालवण्याची ठाम भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. अशा प्रकारे अबोली रिक्षा पुरुष रिक्षाचालकाने चालवणे गैर असून कायद्याचा भंग करणारा प्रकार आहे. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी महिला रिक्षाचालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.

जाब विचारा!

अबोली रिक्षा पुरुष रिक्षाचालक चालवत असल्यास त्यांना याविषयी जाब विचारून त्याची कारणे विचारून घ्या. काही वेळा दुरुस्तीच्या कामासाठी पुरुष रिक्षाचालक रिक्षाचालक चालवताना दिसू शकतो. मात्र तो त्यातून भाडे सोडू शकत नाही. काही पुरुष रिक्षाचालकांनी पत्नीच्या नावे परवाना घेऊन स्वत: रिक्षा चालवण्याचा प्रयत्न सुरू केला असून असा प्रकार थांबण्याची गरज असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

अबोली रिक्षा महिलांनीच चालवावी, असे शासनाचे आदेश असून पुरुषांनी चालवण्यासाठी कोणतीही मोकळीक देण्यात आलेली नाही. पुरुष रिक्षाचालक अबोली रिक्षा चालवताना दिसून आल्यास त्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येईल.

हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gents auto drivers using women auto rickshaw permits in thane