प्राण्यांविषयी असलेली आपुलकी, प्रेम यासाठी घरात श्वान पाळतात. एकीकडे या श्वानांचे दिसणेच श्वानप्रेमींना भुरळ पाडते. हौस म्हणून एखादा श्वान पाळण्यासाठी घरात आणला जातो आणि कधीही न तुटणारे बंध व्यक्ती आणि श्वानांमध्ये बांधले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घराघरांत पाळीव प्राण्यांचे वास्तव्य असताना मनोरंजनात्मक चित्रपटातसुद्धा पाळीव प्राण्यांचे दर्शन घडते. हम आपके है कौन चित्रपटातील टफी नावाचा श्वान चित्रपटाप्रमाणेच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला होता. लहान आकार, शुभ्र पांढरा रंग आणि संपूर्ण शरीरावर केस यामुळे या श्वानांच्या लोकप्रियतेत भर पडते. सगळ्याच प्राणीप्रेमींना भुरळ घालणारे हे श्वान ब्रीड मूळचे जर्मनीचे आहे. जगभरात जर्मन स्पीट्झ या नावाने हे श्वान ओळखले जातात. पोमेरेनियन श्वानांप्रमाणे दिसत असल्यामुळे हे श्वान भारतात पॉर्म नावाने प्रचलित आहेत. भारतात साधारण चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी जर्मन स्पीट्झ हे श्वान आले. आजही या श्वानांची लोकप्रियता कायम आहे. जॅपनिझ स्पिट्झ असेदेखील या श्वानांना म्हटले जाते. शुभ्र पांढरा रंग या श्वानांचा मुख्य रंग आहे. मात्र वेगवेगळ्या रंगात देखील हे श्वान सुंदर दिसतात. घरात पाळण्यासाठी अतिशय सोपे असलेले हे श्वान लोकप्रिय आहेत. पूर्वी जर्मन स्पीट्झ जातीच्या श्वानांचे मोठय़ा प्रमाणात ब्रीडिंग होत होते. मात्र सध्या या श्वानांचे ब्रीडिंग फार कमी झाले आहे, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. सुरुवातीला अगदी चारशे ते पाचशे रुपयांपासून हे श्वान मिळत होते. मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात जर्मन स्पीट्झ श्वान पाळलेले आढळतात. दिसायला हे श्वान लहान आणि चेहऱ्याने गोंडस असले तरी या श्वानांचा स्वभाव काही प्रमाणात रागीट आहे. त्यामुळे घरात पाळल्यावर उत्तम वॉचडॉग प्रमाणे हे श्वान काम करतात. आजूबाजूच्या परिसरात संशयास्पद व्यक्तींची हालचाल जरी झाली तरी हे श्वान लगेचच सतर्क होतात. आपल्या पालकांचे लक्ष वेधून घेतात. इतर श्वान ब्रीडच्या तुलनेत जर्मन स्पीट्झ या जातीच्या श्वानांना फारशी लोकप्रियता मिळाली नाही. आजही या श्वानांना प्राणीप्रेमींकडून मागणी आहे. मात्र त्या तुलनेत या श्वानांचा पुरवठा होत नाही. साधारण तेरा ते चौदा वर्षे या श्वानांचे आयुष्य आहे. मुळातच जर्मन स्पीट्झ हे श्वान चपळ आहेत. घरात पाळल्यावर या श्वानांच्या सततच्या हालचालीमुळे चैतन्य असते. या श्वानांना उत्तम प्रशिक्षण दिल्यास उत्तमरित्या हे प्रशिक्षित होतात. नवव्या दहाव्या वर्षी हे श्वान उत्कृष्ट कामगिरी बजावतात. एखाद्या घरात जर्मन स्पीट्झ पाळलेला असल्यास पुन्हा त्या घरात एखादा श्वान पाळायचा असेल तर जर्मन स्पीट्झ या श्वानांचीच निवड होताना दिसते. या श्वानांची फारशी काळजी घ्यावी लागत नसल्याने घरात पाळण्यासाठी उत्तम श्वान आहेत. उत्तम प्रथिनयुक्त कोणताही आहार या श्वानांना दिल्यास उत्तम राहतात. शाकाहारी आणि मांसाहारी आहार, बाजारात मिळणारा तयार आहार या श्वानांना दिला जातो.

केसांची काळजी आवश्यक

या श्वानांच्या संपूर्ण शरीरावर प्रचंड केस असल्याने सतत ब्रशिंग आणि ग्रुमिंग करणे महत्त्वाचे असते. फारसे आजार या श्वानांना उद्भवत नाहीत. थंडीत या श्वानांच्या केसांची उत्तम वाढ होते. मात्र उन्हाळ्यात शरीरावरील केस गळतात. शरीरावरील केसांची उत्तम काळजी घेतल्यास हे श्वान आजारी पडत नाहीत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German spitz dogs
Show comments