विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही आणि म्हणूनच शाळा, शिक्षक, पालक यांच्याप्रमाणे विद्यार्थीदेखील स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात. सामान्य मुलांप्रमाणे विशेष मुलांसाठी स्नेहसंमेलन खूप महत्त्वाचे असते. विशेष मुलांमध्ये असलेल्या क्षमतांचा जास्तीतजास्त वापर करून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणे, त्यांना दैनंदिन जीवनकौशल्यांमध्ये स्वावलंबी बनवणे आणि पुढील आयुष्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर करणे हे विशेष मुलांच्या शिक्षणाचे व्यापक उद्दिष्ट, अंतिम ध्येय असते. विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्या शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांत त्यांच्या मर्यादेपर्यंत होईल तितका विकास घडवून आणणे हे विशेष शाळांचे अंतिम उद्दिष्ट असते. आणि त्यासाठी विविध उपचारपद्धतींचा अवलंब करण्याबरोबरच, कल्पक उपक्रम, कार्यशाळा, शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जागरूक विशेष शाळा सातत्याने करीत असतात. इथे एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करण्याजोगी की नृत्य, गायन, वादन, संगीत या आपल्यासाठी कळ्या आहेत. पण विशेष मुलांसाठी त्या अतिशय परिणामकारक उपयुक्त उपचारपद्धती ठरल्या आहेत.
स्नेहसंमेलन आणि विशेष मुले याविषयी बोलताना ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटे यांनी अभ्यासपूर्ण मत नोंदवले. त्या म्हणाल्या, ‘घरातील इतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे विशेष मुलांचे कार्यक्रम’ असल्याची जाणीव सगळ्या कुटुंबात आणि विशेषत: भावंडांमध्ये समानत्वाची जाणीव निर्माण होते. या स्नेहसंमेलनामुळे सगळी शाळा (शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक) आणि पालक व विद्यार्थी सर्व जण एकजुटीने कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात. विशेषत: कार्यक्रमाचे उत्तम आयोजन होण्यासाठी शाळेचे व्यवस्थापनकौशल्य पणास लागते. विशेष शाळेच्या शिक्षकांना प्रत्येक मुलाची क्षमता, आवाका लक्षात घेऊन कार्यक्रमाची निवड आणि सादरीकरणाचा विचार करावा लागतो. इथे केवळ कागदावर कल्पना चांगली असून चालत नाही. कारण निवडलेले गाणे, नृत्य, चुटकुले, नाटुकले यांचे विषय मुलांना बऱ्यापैकी समजावून देता येतील, कळतील आणि आवडून ते प्रेक्षकांपर्यंत पोचवता येईल असा व्यापक विचार करावा लागतो. कारण कोणताही कार्यक्रम या मुलांमधील नैसर्गिक निरागसपणा, निष्पापपणा याला मारक ठरणारा, झाकोळून टाकणारा नसावा याबाबत जागरूक राहावे लागते. या निमित्ताने मुलांमधील क्षमतांना वाव मिळतो, आत्मविश्वास प्राप्त होतो, थोडी जबाबदारीने करण्याची जाणीव होते. मुख्य म्हणजे महिना-दोन महिने सराव आणि सादरीकरण यातून खूप आनंद मिळतो. पालकांना आणि उपस्थित सर्व मंडळींना ही मुले काही करू शकतात याची खात्री पटते.
जिद्द शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. प्रार्थना, गणेश वंदना, कोळीनृत्य-लोकनृत्य असे समूहनृत्य, छोटे नाटुकले आणि मधूनमधून चुटकले असे कार्यक्रमाचे स्वरूप असते.
ठाण्यातील जागृती पालक संस्था ही समाजातील मतिमंदत्व आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या विकासाचे आणि पुनर्वसनाचे ध्येय बाळगून कार्य करणारी संस्था आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेला वार्षिक कार्यक्रम पाहताना स्नेहसंमेलनाचे आगळेवेगळे रूप उपस्थितांना अनुभवता आले. सर्वसामान्य मुले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सण-उत्सव, लग्नकार्य, सहल, पार्टी, पिकनिक अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून सातत्याने मजा करीत असतात. पण विशेष मुलाला मोठे करताना बऱ्याचदा पालक आयुष्यातला आनंदही अनुभवायचा असतो enjoy करायचे असते हे विसरून जातात. पण या कार्यक्रमात विशेष मुले, त्यांच्या माता, आणि भावंडे यांचे मोजके आणि नेटके कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष मुले आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य यांनी दोन तासांच्या कार्यक्रमाचा एकत्रित आनंद घेतला. संस्थेचे हितचिंतक, आमंत्रित सुहृद यांच्यासाठी हा एक संस्मरणीय अनुभव होतो. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या पटांगणात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे समूहनृत्य सादर झाले. स्त्री-पालक सदस्यांनी सादर केलेले लेझीम नृत्य बहारदार झाले. या सर्व कार्यक्रमांनी उपस्थितांची (२०० ते २५० प्रेक्षक) दाद प्राप्त केली. आवर्जून नमूद करण्याजोगी बाब म्हणजे विशेष मुलांच्या भावंडांनी दोन कार्यक्रम सादर केले. सर्वसामान्य भावंडांनाही सामावून घेण्याचा, कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न स्तुत्यच आहे. विशेष मुलांना आनंद मिळावा म्हणून त्यांच्यासाठी दामले आणि आठवले ग्रुपचा गीतगायनाचा कार्यक्रम आवर्जून आयोजिण्यात आला होता. ठेक्यावरील गाजलेल्या मराठी गीतांची निवडही योग्य होती. कारण मुलांनी उत्स्फूर्तपणे मोकळ्या मैदानात येऊन काही गाण्यावर नृत्य केले आणि आपली दादही देऊन टाकली. इथे या कार्यक्रमात भाषणे, बक्षीस वाटप इत्यादी गोष्टींना वगळण्यात आले होते. केवळ संस्थेच्या सल्लागार श्यामश्री भोसले यांनी प्रास्ताविकात जागृतीच्या कार्याचा अगदी थोडक्यात आढावा घेतला. त्यामुळे पालक आणि उपस्थितांना संस्थेच्या कार्याचा, प्रगतीचा अंदाज घेता आला. विशेष म्हणजे अपंग आणि मतिमंद व्यक्तींविषयासंदर्भातील शासनाचे कायदे, सोयी-सुविधा, योजना याविषयी माहिती देणारे अनेक फलक सहजपणे दृष्टीस पडत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद, मनोरंजन, प्रबोधन अशा सर्व पैलूंना स्पर्श करताना कार्यक्रमाला काहीसे व्यापक रूप देण्याचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य असाच!
विशेष मुलांसाठी त्यांचे शिक्षण, व्यवसायपूर्व प्रशिक्षण, भविष्यातील त्यांचे आत्मनिर्भर होणे यासाठी जे काही विविध स्वरूपाचे प्रयत्न होतात त्याची दोन प्रमुख उद्दिष्ट असतात. मुलांना मुख्य समाजप्रवाहात आणणे व समाजाला या कार्याशी जोडणे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून ते टप्प्याटप्प्याने साध्य होत आहे आणि होणार आहे. (पूर्वार्ध)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा