गेल्या लेखामध्ये सर्वसाधारण मुलांप्रमाणे विशेष मुलांसाठीदेखील स्नेहसंमेलन (गॅदरिंग) खूप महत्त्वाचे असते हे पाहिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मुले, पालक, शाळा आणि समाज या सर्व घटकांना काय मिळते हे आपण पाहिले. ही मुले (आणि त्यांचे कुटुंब) या समाजाचाच घटक आहेत, ते ही त्यांच्या श्रमतेनुसार काही करू शकतात हे अशा स्वरूपाच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवता येते आणि समाजाला जोडून घेता येते. स्नेहसंमेलनाचे विशेष मुलांच्या विकसनाच्या दृष्टीने महत्त्व जाणून घेतले.
ठाण्यातील घंटाळी मंदिराजवळ गतिमंद मुलांसाठी विश्वास केंद्र चालवले जाते. गतिमंद मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना कार्यक्षम करण्यासाठी या केंद्रात व्यवसायपूर्व प्रशिक्षण दिले जाते. मुख्याध्यापिका सौ. मीना क्षीरसागर म्हणतात, स्नेहसंमेलनासारखे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, विविध उपक्रम यांमधील सहभाग विशेष मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण जो अनुभव मिळतो त्यातून ते शिकत जातात. खरं तर या मुलांमध्ये ज्या क्षमता आहेत त्याचा आपल्यालाही अंदाज नसतो. अशा सातत्यपूर्ण सहभागातून त्यांच्या या क्षमतांची चुणूक दिसून येते आणि काही वेळा ते पाहून आपणही चकित होतो. आमच्या एका स्नेहसंमेलाच्या वेळी कार्यक्रम सुरू असताना एका मुलाला वाक्य आठवले नाही. पण दुसऱ्याने ती वेळ छान निभावून नेली. सर्व उपस्थितांसाठी तो एक सुखद धक्का होता.
या मुलांचा आवाका, त्यांची आवड व समज लक्षात घेऊन कार्यक्रमाची आखणी केली जाते. साधारणपणे गणेश वंदना, समूह नृत्य, नाटुकले, मध्ये-मध्ये चुटकुले आणि फॅशन शो असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. या फॅशन शोचे वैशिष्टय़ म्हणजे विश्वास केंद्रात ज्या वस्तू तयार केल्या जातात, त्या घेऊन मुले रँपवॉक करतात. या दिवशी विश्वासमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले जाते. त्याप्रमाणे आदर्श विद्यार्थी, आदर्श पालक अशी बक्षिसेही आवर्जून दिली जातात. खरं तर हा कार्यक्रम म्हणजे मुलांचा कौतुक सोहळाच असतो. या दिवशी पालक, समाजातील सुखद संस्थेशी जोडल्या गेलेल्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना आवर्जून आमंत्रित केले जाते. सर्व उपस्थितांमुळे त्यांच्या मर्यादित क्षमतेच्या साहाय्याने पण खूप काही करूशकतात, हे अनुभवता यावं आणि या कार्यात समाजाचा सहभाग वाढावा असा प्रामाणिक विचार यामागे असतो.
‘चैतन्य’ या मतिमंद मुलांसाठी असलेल्या उद्योगशाळेतही दरवर्षी मुलांसाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेली जवळजवळ २४-२५ वर्षे ही परंपरा जोपासली जात आहे. या दिवशी साधारणपणे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एखाद्या महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा, सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस समारंभ असे कार्यक्रमाचे स्वरूप असते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होते.
गॅदरिंगच्या आधी चैतन्यमध्ये येणाऱ्या मुलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या सर्व स्पर्धाची बक्षिसे मुलांना त्याच दिवशी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचे कौतुक केले जाते. त्याचप्रमाणे वर्षभरात अनेकविध स्पर्धामध्ये मुलांनी जी बक्षिसे मिळविलेली असतात, तीदेखील त्याच दिवशी दिली जातात.
दिवाळीची सुट्टी संपल्यावर सरावाला सुरुवात केली जाते. मुलांची क्षमता, त्यांचा कल आणि आवड लक्षात घेऊन मग वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी निवड केली जाते. ज्यांची स्मरणशक्ती, उच्चार चांगले आहेत, त्यांना कविता/ स्तोत्र/ श्लोक म्हणण्यासाठी निवडले जाते. ज्यांना गाणे व त्यावर आधारित नृत्य कसे करायचे हे समजून घेता येते, करता येते, ती मुले नृत्यात घेतली जातात. त्याचप्रमाणे ज्या मुलांना न घाबरता बोलता येते, चांगले लक्षात राहते, त्यांना छोटय़ा नाटुकल्यांमध्ये घेतले जाते. उर्वरित मुलांना फॅशन शोमध्ये घेतले जाते. सर्वच मुलांना स्टेजवर येण्याचा अनुभव आवर्जून दिला जातो. बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले जाते. त्याचप्रमाणे खाऊही दिला जातो. या सर्वातून मुलांना खूप आनंद मिळतोच, पण त्याचबरोबर त्यांना आत्मविश्वासही मिळतो. स्टेजवर वावरण्यामुळे त्यांच्या मनातील भीती दूर होते. एकमेकांचे पाहून आपणही करायची प्रेरणा त्यांना मिळते, असे चैतन्यचे अनुभवी कार्यकर्ते सांगतात.
जव्हेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच साजरे झाले आणि त्यात अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळाले. मुलांनी हेलन केलर यांचा जीवनप्रवास मुकाभिनयातून परिणामकारकपणे सादर केला. दुसऱ्या कार्यक्रमात दृश्य स्वरूपात शिवाजी महाराजांच्या जीवनाचा वेध घेण्यात आला. या मुलांना गाणे ऐकता येत नसूनही त्यांनी सादर केलेली नृत्ये उपस्थितांची दाद मिळवून गेली. मुख्याध्यापिका बागेश्री वेलणकर म्हणाल्या, मुलांची क्षमता आणि कल पाहून कार्यक्रम बसविताना त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, हे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा