राजकीय वादातून उल्हासनगरमध्ये तब्बल २५ वर्षांपूर्वी भतिजा बंधूंचा खून करण्यात आला होता. उल्हासनगरचा माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानी आणि त्याच्या सात साथीदारांनी हा खून केल्याचे नंतर पोलीस तपासात उघड झाले होते. यामधील इंदर भतिजा खून प्रकरणात पप्पू कलानीला दोन वर्षांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा झाली. आता घन:श्याम भतिजा यांच्या खुनाचे प्रकरण कल्याण न्यायालयात सुनावणीसाठी आले आहे. घन:श्याम यांच्या आठही मारेक ऱ्यांना कल्याण न्यायालयात सुनावणी असेल त्या वेळी हजर करण्यात यावे, अशी मागणी सरकार पक्षाचे वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांच्याकडे केली.
घन:श्याम भतिजा प्रकरणाची दोन दिवसांपूर्वी कल्याण न्यायालयात सुनावणी होती. या वेळी या खून प्रकरणातील आठही आरोपी कल्याण न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. परंतु, त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले नाही. त्यामुळे सरकारी वकील पाटील यांनी यापुढील न्यायालयात घन:श्याम खून प्रकरणाची ज्या वेळी तारीख आणि सुनावणी असेल त्या वेळी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात यावे; उच्च, सर्वोच्च न्यायालयाने हा खटला लवकर निकाली काढावा, अशा विनंत्या केल्या आहेत.