किशोर कोकणे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : घोडबंदर मार्गावरील घाटरस्त्याच्या कामासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला असून त्याला वन विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. घाटरस्त्याच्या दोन्ही बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग येतो. हा प्रस्ताव वन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. वन विभागाची मंजुरी मिळाल्यास रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात प्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे अद्याप परवानगी मिळालेली नाही.

मुंबई, ठाणे, उरण, गुजरात आणि नाशिक भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरील घाटरस्त्याचे काम प्रस्तावित आहे. गोदामांच्या दिशेने हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मागापैकी हा एक मार्ग आहे. या मार्गावर घाट रस्ता असून तिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यातच नागमोडी रस्ता असलेल्या घाटातील चढणीवर अनेक अवजड वाहने बंद पडतात आणि त्यामुळे कोंडी होते. या मार्गावर अनेकजण विरुद्ध मार्गावरून वाहतूक करतात आणि यामुळे या मार्गावरही कोंडी होते. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला कायदिश देण्यात आले आहेत. या कामासाठी नऊ कोटी ५० लाख खर्च येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-NIA ची मोठी कारवाई; महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन?

१५ दिवसांत मंजुरी ?

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याला विचारले असता, प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. मंजुरीही अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात या कामासंदर्भाची बैठकही घेण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत मंजुरीची शक्यता आहे. त्यानंतर वाहतूक विभागाची परवानगी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.

घाटरस्ता समांतर

घोडबंदर घाटात चेना पूल ते काजूपाडा भागात अनेक ठिकाणी चढ-उताराचा भाग आहे. येथे अनेक अपघात घडत असतात. अवजड वाहनेही रस्त्यावर बंद पडतात. त्यामुळे हा घाटमार्ग समांतर पातळीवर केला जाणार आहे. या कामासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, परंतु कामादरम्यान मोठी कोंडी होऊन त्याचा फटका ठाणे, काशीमिरा, वसई भागातील वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghat road on ghodbunder marg awaiting approval mrj
Show comments