लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : घोडबंदर येथील एका मोठ्या गृहसंकुलाला वर्षाला १६ लाखांचे देयक भरूनही पुरेशा पाणी पुरवठा होत नसून त्यांना टँकरने पाणी खरेदी करण्यावर वर्षाकाठी २९ लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. अशीच अवस्था येथील इतर गृहसंकुलाची असून यामुळे महिन्याच्या देखभाल व दुरुस्ती खर्चात वाढ झाल्याने नागरिकांचे महिन्याच्या घरखर्चाचे गणित कोलमडले आहे. यानिमित्ताने घोडबंदरमधील पाणी टंचाईची समस्या अद्यापही कायम असल्याची बाब पुढे आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरात मोठ-मोठी गृहसंकुले गेल्या काही वर्षात उभी राहिली आहेत. आजही याठिकाणी गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागातील गृहसंकुलांच्या उभारणीसाठी ठाणे महापालिकेकडून परवानगी देण्यात येत असली तरी या भागांमध्ये पालिकेकडून पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. यामुळे कोट्यावधी रुपयांची घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या भागातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे दावे ठाणे महापालिकेकडून करण्यात येत आहे. परंतु हे दावे फोल असल्याचे आता पुन्हा उघड झाले आहे. घोडबंदर भागात दररोज ११५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. परंतु त्याप्रमाणातही पाणी पुरवठा होत नसल्याचे सुत्रांकडून समजते. घोडबंदर येथील कासारवडवली भागातील ग्रँड स्कवेअर या संकुलातील रहिवाशांसह माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी पालिका पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या. तसेच त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली.

आणखी वाचा-ठाण्यात कचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती

ग्रँड स्कवेअर या संकुलामध्ये एकूण १३ इमारती आहेत. दहा इमारती सात मजल्याच्या, एक इमारत दहा मजल्याची तर दोन इमारती १५ मजल्याच्या आहेत. या संकुलात एकूण ४८८ सदनिका आहेत. या संकुलासाठी दररोज दोन लाख लीटर इतका पाणी पुरवठा होणे अपेक्षित असताना केवळ ८० हजार लीटर इतकाच पाणी पुरवठा होत आहे, अशी माहिती संकुलाचे सचिव जनार्दन लाड आणि खजिनदार नीलेश मांढरे यांनी दिली. वर्षाला १६ लाखांचे देयक भरूनही पुरेशा पाणी पुरवठा होत नाही. यामुळे टँकरने पाणी खरेदी करावा लागत असून त्यासाठी वर्षाकाठी २९ लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. यामुळे महिन्याच्या देखभाल व दुरुस्ती खर्चात वाढ झाल्याने नागरिकांचे महिन्याच्या घरखर्चाचे गणित कोलमडले आहे. काही नागरिक वाढीव पैसे देण्यास नकार देत आणि त्यावरून संकुलात वादाचे प्रसंग उद्भवतात, असे त्यांनी सांगितले. आमच्या सारखीच इतर संकुलांची अवस्था असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात महापालिका पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

आणखी वाचा-ठाणे: रिक्षा चालकाच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी खेचली

घोडबंदर भागाचे मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून त्यांनाच पुरेसे पाणी मिळत नाही. याठिकाणी ५० हजार घरांची निर्मीती झालेली असून त्याठिकाणी नागरिक वास्तव्यासाठी येणार आहेत. त्यांना पाणी कसे मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने यापुर्वी दिलेल्या आदेशानुसार जोपर्यंत वाढीव पाण्याचे नियोजन होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नका, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी दिली.