ठाणे : घोडबंदर परिसरात रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर ठाण मांडणारे फेरिवाले, तिथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, उघड्यावर असलेल्या वीज वाहिन्या, चालण्यासाठी पदपथ नाहीत, विविध कार्यक्रमांमुळे मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत, कचरा उचलला जात नाही, अशा विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा मंगळवारी घोडबंदरवासियांनी पालिका प्रशासनापुढे मांडला. आम्हाला हक्काचे पुरेसे पाणी देण्यासाठी उपलब्ध नसते. मग, टँकरचालकांना पाणी कसे मिळते, असा प्रश्नही रहिवाशांनी पालिका प्रशासनाला विचारला. त्यावर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. आजही याठिकाणी गृहसंकुले उभारणीची कामे सुरू आहेत. वाढत्या नागरिकरणाबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्यात प्रामुख्याने पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येचा समावेश असून त्याचबरोबर आता फेरिवाल्यांच्याही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, मनोज तायडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आणि घोडबंदर भागातील गृहसंकुलांचे प्रतिनिधी राजेश अढांगळे, मेर्सी, विजय पांचाळ, रोशन माखिजा, विजय देसाई, डाॅ, तृप्ती आनंद, संतोष सिंग, निखिल ठोंबरे, प्रविण नाखवा यांच्यासह एकूण ४७ गृहसंकुलांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. घोडबंदर भागात अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून नुतनीकरण करण्यात आले आहे. परंतु या रस्त्यांवर आता फेरिवाले बसत आहेत. त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यावर दुहेरी बेकायदा पार्किंग करत आहेत. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही गृहसंकुलांनी रस्ते रुंदीकरणासाठी आपली जागा दिली आहे. त्यांची वाहने रस्त्याकडेला उभी केली जातात. परंतु त्याव्यतिरिक्तही वाहने उभी राहत आहेत. अशी वाहने हटविण्यासाठी वाॅर्डन नेमले पाहिजेत. या वाॅर्डनचा पगार सोसायटी पैसे देण्यास तयार आहे, असे मुद्दे घोडबंदर भागातील रहिवासी मुकेश ठोंबरे यांनी मांडले.
हेही वाचा >>>Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
घोडबंदर भागात नागरिकांना चालण्यसाठी पदपथ उपलब्ध नाहीत. खोदकाम करून वीज वाहिन्या उघड्यावर टाकण्यात आलेल्या आहेत. या वाहिन्यांमुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो, अशी भिती काही रहिवाशांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही. घोडबंदर भागात मुलांना खेळण्यासाठी मैदाने आहेत. परंतु त्याठिकाणी विविध कार्यक्रम होत असल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत, अशा समस्या यांनी मांडल्या. वाघबीळ गावातील नागरिकांनी मैदान टिकवून ठेवले असून त्यांच्या तिथे खेळाच्या स्पर्धा होतात. त्यांच्याकडून पालिका स्पर्धेसाठी पैसे आकारत होती. ही बाब अत्यंत चुकीची आहे, असे खासदार म्हस्के यांनीही सांगितले. घोडबंदर भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे, ती सोडविवणे गरजेचे आहे, अशा समस्याही रहिवाशांनी मांडल्या.
हेही वाचा >>>उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक
टँकरलाबीसाठी टंचाईचा आरोप
घोडबंदर भागातील अनेक गृहसंकुलांना पाणी टंचाईची समस्या जाणवते. या संदर्भात पालिकेत एखादी बैठक झाली की, महिनाभर पाणी पुरवठ्यात सुधारणा होते. त्यानंतर पुन्हा टंचाईची समस्या जाणवू लागते. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतो. पण, ते आम्हाला मिळत नाही. आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते, असा प्रश्न रहिवाशी डाॅ. तृप्ती आनंद यांनी मांडला. रस्त्याच्या कडेला काही टँकर बोरवेलद्वारे पाणी घेऊन ते शुद्ध जल असल्याचे भासवून त्याचा पुरवठा करतात. त्यावर पालिकेने यापुर्वी कारवाईही केली होती. तसेच पालिकेक़डून विनामुल्य टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु जास्त टँकर हवे असल्यास त्यासाठी पैसे आकारले जातात, असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले. सीसीटिव्ही बंदावस्थेत आहे. ते सुरू करण्यात यावेत, अशी मागणीही रहिवाशांनी केली.
घोडबंदरवासियांनी बैठकीत मांडलेल्या समस्या येत्या काही दिवसांत सोडविण्यात येतील. तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होतील, यावरही लक्ष दिले जाईल.-प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका
ठाणे महापालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा चांगल्याप्रकारे द्याव्यात, इतकीच घोडबंदरवासियांची अपेक्षा आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या सोडवून त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. खेळाचे मैदान मुलांना विनामुल्य उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी लक्ष द्यावे. पाणी पुरवठ्यासंबंधी रहिवाशांनी जो काही आरोप केला आहे, त्यानुसार टँकर लॉबीला आळा घालून याप्रकरणाची चौकशी करावी आणि तत्काळ कारवाई करण्यात यावी.-नरेश म्हस्के, खासदार, ठाणे लोकसभा