जयेश सामंत, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मेट्रो मार्गिका, उड्डाणपुलांची कामे यामुळे काही वर्षांपासून सर्वाधिक कोंडीचा ठरलेल्या ठाण्यातील कापूरबावडी ते गायमुख पर्यंतचा घोडबंदर मार्ग आणखी रुंद आणि खड्डेमुक्त करण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखला आहे.

घोडबंदर मार्ग नियोजित मेट्रो मार्गिकांच्या खांबांमुळे अरुंद झाला आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येने नागरी संकुलांची उभारणी सुरू असून एक प्रकारे विस्तारित ठाणे येथे उभे रहात आहे. हे लक्षात घेऊन घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर असणाऱ्या सेवा रस्त्यांचे मूळ मार्गात एकत्रिकरण करून चार-चार अशा एकूण आठ मार्गिकांचे पूर्णपणे काँक्रीटीकरण केले जाणार आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्याला अंमली पदार्थांचा विळखा, ११ महिन्यात ८५९ आरोपींना अटक

कापूरबावडी जंक्शन ते गायमुखपर्यंत असलेल्या घोडबंदर मार्गाची एकूण लांबी १३.५ किलोमीटर इतकी आहे. यापैकी ९.३ किलोमीटरचा हा रस्ता ठाणे महापालिका हद्दीत, तर उर्वरित रस्ता हा मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत मोडतो. ठाणे पालिका हद्दीतील घोडबंदर रस्त्याची एकूण रुंदी ही ४२ मीटर इतकी आहे. याशिवाय या रस्त्यास दोन्ही बाजूस नऊ मीटर रुंदीचे दोन सेवा रस्ते आहेत. कापूरबावडी ते गायमुखपर्यंत या रस्त्याच्या प्रत्येकी चार-चार मार्गिका (सेवा रस्त्यांसह) असून यापैकी दोन मार्गिकांचे काँक्रीटीकरण केले आहे. याशिवाय मूळ रस्त्यातील प्रत्येकी एक-एक मार्गिका आणि दोन्ही बाजूंचे सेवा रस्तेही डांबराचे आहेत. तसेच या रस्त्यावर मानपाडा, वाघबीळ, पातलीपाडा आणि कापूरबावडी अशा चार ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत.

या मार्गावरून मुंबई-अहमदाबाद मार्गावरून येजा करणाऱ्या वाहनांची संख्याही गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याशिवाय मार्गाच्या दोन्ही बाजूस नागरीकरणाचा वेगही बराच मोठा आहे. घोडबंदर मार्गाला पर्यायी मार्गांची चाचपणी सध्या सुरू असली तरी पुढील काही वर्षे तरी या मार्गाला दुसरा पर्याय नाही, असेच चित्र आहे.

आणखी वाचा-कल्याण : वळण रस्त्यासाठी आधारवाडी कचराभूमीतील कचऱ्याचा ढीग हटविण्यास प्रारंभ

या मार्गावर मेट्रो मार्गिका -४ चे बांधकाम सध्या सुरू असून अनेक ठिकाणी मेट्रोचे खांब हे सेवा रस्ता तसेच मूळ मार्गाच्या दुभाजकावर येत आहेत. मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतरही मेट्रोच्या या खांबांमुळे हा मार्ग अनेक ठिकाणी अडथळ्यांचा ठरण्याची भीती आहे. त्यामुळे मेट्रो निर्माणानंतरही भविष्यात या मार्गावरील कोंडी कमी होईल का हा प्रश्न नियोजनकर्त्यांना सतावू लागला आहे. यावर उपाय म्हणून मूळ मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या सेवा रस्त्यांचे मूळे मार्गात विलिनीकरण करून हा संपूर्ण मार्ग दोन्ही बाजूस प्रत्येकी चार, असा एकूण आठ पदरी करण्याचा प्रस्ताव ‘एमएमआरडीए’ने आखला आहे.

५६० कोटींचे नियोजन

‘एमएमआरडीए’च्या नव्या प्रकल्प आराखड्यानुसार कापूरबावडी ते गायमुख या ९.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यासाठी ५६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गायमुख रेतीबंदर ते जुना जकात नाका या भागात सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे या भागात मोठी कोंडी होते. या भागातील रुंदीकरणासाठी ठाणे महापालिकेमार्फत भूसंपादन केले जाणार असून तेथेही आठ पदरी काँक्रीट रस्त्याची बांधणी केली जाणार आहे.

आणखी वाचा-तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले; तरुणाने पत्नीसह केली दोन मुलांची हत्या

ठाणे घोडबंदर रस्ता हा मुख्य मार्ग आणि सेवा रस्ता अशा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असा हा दुवा आहे. या मार्गावरून गुजरात, दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या दिशेने प्रवास केला जातो. हा मार्ग ठाणे शहरातील वाहतुकीसाठी देखील महत्त्वाचा आहे. या मार्गाचे हे महत्त्व लक्षात घेऊन सेवा रस्त्यांना मुख्य मार्गाला जोडण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे. यामुळे दोन्ही बाजूस अत्यंत विस्तीर्ण आणि आठ पदरी रस्ता वाहनचालकांना मिळू शकेल. -डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghodbunder road will be soon widened mrj