कोणतेही घर हे त्यात राहणाऱ्या कुटुंबाच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असते. ग्रामीण भागातही त्याची प्रचीती येते. सर्वसाधारणपणे गावात प्रतिष्ठित असणाऱ्यांची घरे थोडी मोठी आणि भव्य असतात. मुरबाड तालुक्यातील काही गावांमध्ये अद्याप दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या खोत संस्कृतीच्या खुणा असलेले वाडे आढळून येतात. धसई गावातील घोलपवाडा त्यांपैकीच एक..
मुरबाड तालुक्यातील जुन्या वास्तूंचा शोध घेत असताना येथील आवर्जून भेट देण्याजोग्या घरांची यादी आपण मागील लेखात पाहिली. मुरबाड तालुक्यातील या मोजक्या घरांच्या यादीत एका घराचा आवर्जून उल्लेख केला जातो तो म्हणजे धसई गावातील घोलपांच्या वाडय़ाचा. कल्याणपासून मुरबाडच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर ‘धसई’ गाव लागते. या गावात पोहोचल्यानंतर एक भव्य वाडा आपल्या दृष्टीस पडतो. तो वाडा म्हणजेच ‘घोलपवाडा’.
ब्रिटिशांच्या काळात गावातील महसूल गोळा करण्यासाठी एक पद निर्माण करण्यात आले होते. हे पद म्हणजे ‘खोत’ होय. गावातील मंडळींकडून धान्यरूपी, पैसेरूपी महसूल गोळा करणे तसेच दिवाणी, फौजदारी आदी कामे या खोत मंडळींच्या अखत्यारीत येत असत. त्याचप्रमाणे काही प्रमाणात न्यायालयीन कामेही करण्याचा या मंडळींना अधिकार असे. काही खोत मंडळींचा एकत्रित मिळून एक वरिष्ठ अधिकारी नेमण्यात येत असे. या अधिकाऱ्यास ‘सरखोत’ म्हणून ओळखले जाई. धसई गावात असणाऱ्या घोलपवाडय़ाचे मालक कै. दगडूजी पाटील घोलप हे या गावाचे ‘सरखोत’ म्हणून कारभार पाहत असत. कै. दगडूजी पाटील घोलप हे स्वत: ‘सरखोत’ असल्याने त्यांच्याजवळ आर्थिक सुबत्ता होती. त्यातूनच त्यांनी धसई गावात भव्य असा ‘घोलप’वाडा बांधला. घोलप कुटुंबांकडे घरनोंदीचा अभाव असल्याने हा वाडा नक्की कधी बांधण्यात आला, याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. तालुक्यातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक म्हणून घोलप कुटुंबीय आजही ओळखले जातात.
धसई गावातील घोलपवाडय़ासमोर उभे राहिल्यानंतर आपण अवाक झाल्याशिवाय राहत नाही. वाडय़ात प्रवेश करण्यासाठी दोन ते तीन पायऱ्या चढून आत यावे लागते. वाडय़ात प्रवेश करताना वाडय़ाच्या दर्शनी भागातील खांबावर असलेले आकर्षक नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. वाडय़ाच्या या खांबावर एक मानवी आकृती असल्याचे पाहायला मिळते. या मानवी आकृतीच्या कंबरेवर पट्टा, डोक्यावर शिंदेशाही पगडी, एका हातात छडी तर दुसऱ्या हातात पोपट असल्याचे पाहायला मिळते. पोपट हे ऐश्वर्याचे आणि रसिकतेचे प्रतीक मानले जाते. किंबहुना म्हणूनच पोपटाचे चित्र असलेले नक्षीकाम वाडय़ाच्या या खांबावर वारंवार आढळून येते. त्याचप्रमाणे या खांबावर एक स्त्रीशिल्पही कोरले असल्याचे पाहायला मिळते. या शिल्पामध्ये स्त्रीरूपी आकृतीच्या डोक्यावर मुकुट, बाजूला पंख, नऊवारी साडी नेसल्याचे पाहायला मिळते. वाडय़ाच्या दर्शनी भागातील या खांबावर कोल्ह्य़ासारखा दिसणारा प्राणी, मोर यांचे शिल्पही पाहायला मिळते. वाडय़ाच्या खांबावरील हे नक्षीकाम पाहत पाहत आपण वाडय़ाच्या दिशेने प्रस्थान करायला लागतो. वाडय़ाच्या दिशेने पुढे सरकल्यानंतर प्रथम आपल्याला ओटीचा भाग लागतो. घोलप वाडय़ाच्या ओटीचा भाग प्रशस्त असून या ठिकाणी लाकडी झोपाळा, भिंतीतील कपाटे, कोनाडे पाहायला मिळतात. ओटीच्या भागातून वाडय़ाच्या मुख्य भागात जाण्यासाठी लाकडी दरवाजातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. घोलपवाडय़ामध्ये एकूण १५ खोल्या असून सर्व खोल्या प्रशस्त असल्याचे पाहायला मिळते. वाडय़ाच्या पहिल्या मजल्यावर दिवाणखाना आहे. पहिल्यांदा वाडा पाहायला आलेला मनुष्य वाडय़ाची रचना पाहून चक्रावल्याशिवाय राहत नाही. घोलप वाडय़ाच्या बांधकामात शिसव आणि सागवी लाकडाचा वापर करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या कामात वाडय़ाचा पुढचा भाग पाडण्यात आला. वाडय़ाच्या या भागात वापरण्यात आलेले लाकडी खांब, खांबावरील विविध नक्षीकाम आज वाडय़ातील एका खोलीत इतिहासाची साक्ष देत पडून आहेत. वाडय़ातील एका खोलीत पूर्वीच्या काळी वापरण्यात येणारे कंदील, भाकरी भाजण्यासाठी वापरण्यात येणारी परात, ताटं-वाटय़ा तसेच अंघोळीसाठी वापरण्यात येणारे घंगाळेही पाहायला मिळतात. घोलपवाडय़ात काही ठिकाणी शेणाने सारवलेल्या जमिनी तर काही ठिकाणी आधुनिक पद्धतीच्या फरशा बसविल्याचे पाहायला मिळते.
घोलप कुटुंबीयांनी हा वाडा कधी काळी विजया बँकेला बँकेच्या कामासाठी भाडेतत्त्वावर दिला होता. आजमितीला वाडय़ात प्रभाकर नारायण घोलप, त्यांची पत्नी हिराभाई प्रभाकर घोलप, मुलगा संतोष घोलप आणि कुटुंबीय, मुलगा धनाजी घोलप आणि कुटुंबीय राहत आहेत. वाडय़ाचा एक भाग लॉण्ड्री व्यावसायिकाला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. घोलप घराण्याकडे सरखोत पदवी असल्याने साहजिकच त्यांच्याकडे सुबत्ता होती. कै. दगडूजी पाटील घोलप यांनी कै. नारायण गणेश घोलप यांना १२५ एकर जमीन, १२५ तोळे सोने, १२५ तोळे चांदी, १२५ ताटवाटय़ा, १२५ पाट दिल्याचे घोलप कुटुंबीय आवर्जून सांगतात. घोलप कुटुंबीयांची तालुक्यातील विविध परिसरात भातशेतीही आहे.
घोलपवाडा धसई, तालुका- मुरबाड, जिल्हा- ठाणे ४२१४०२