राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्याने सेनेची ताकद वाढणार असल्याचे मानले जात असले तरी मेन्डोन्सा यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेपुढे नवेच आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. मेन्डोन्सा हे आजवर आपल्या एकछत्री कारभारासाठी प्रसिद्ध आहेत आणि शिवसेनेत अंतिम शब्द मातोश्रीचा असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या मर्जीनुसार कारभार हाकण्याची सवय असलेले मेन्डोन्सा शिवसेनेच्या संस्कृतीत कसे रुळणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरचे निर्णय संपर्कप्रमुख म्हणून आमदार प्रताप सरनाईक हे घेत असतात. मात्र राष्ट्रवादीत असतानाही वरिष्ठांचे आदेश फारसे मनावर न घेणारे मेन्डोन्सा सरनाईकांशी जुळवून घेणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शिवसेनेचे स्थानिक पातळीवरच्या निर्णयांनाही अंतिम स्वरूप मातोश्रीवरच मिळत असते. सेनेत संघटनेला अधिक महत्त्व दिले जाते. आता मेन्डोन्सांच्या प्रवेशानंतर सेनेच्या निर्णय प्रक्रियेत मेन्डोन्सांना नेमके काय स्थान असणार आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मेन्डोन्सा आपल्या अस्तित्वासाठी धडपडत असल्याने सध्या सेना नेत्यांच्या सुरात सूर मिळवतात की या ठिकाणीदेखील वेगळी चूल मांडतात यावर त्यांची पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे.
स्वकेंद्री राजकारण
गेली ३० वर्षे गिल्बर्ट मेन्डोन्सा मीरा-भाईंदरच्या राजकारणावर आपली पकड ठेवून होते. मेन्डोन्साच्या स्वभावानुसार त्यांनी कायम स्वकेंद्री राजकारण खेळले. नगरसेवकपदाच्या उमेदवारांची निवड करण्यापासून ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यापर्यंत, पक्षाशी संबंधित असलेल्या विविध निर्णयांपासून ते महापालिकेच्या कारभारापर्यंत कशातच त्यांनी पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांना ढवळाढवळ करू दिली नाही. ठाणे जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याशी त्यांचे सूर कधीच जुळले नाहीत. त्यांच्या जनता दरबाराला तसेच इतर कार्यक्रमांनाही त्यांनी कायम पाठच फिरवली. त्यांच्या या स्वभावामुळेच राष्ट्रवादीचे दादा नेते मीरा-भाईंदरकडे कधी फिरकले नाहीत.