School Male Cleaner Abuse Girls in Badlapur: बदलापूरमध्ये शाळेतील ३ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यावरून हजारोंच्या संख्येनं बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकावर रेलरोको करण्यात आला असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मार्गावर एकही रेल्वे धावली नाही. आंदोलकांशी सल्लामसलत करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. मात्र, आंदोलकांनी आंदोलन थांबवण्याची त्यांची विनंती अमान्य केली. यावेळी गिरीश महाजन यांनी सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहेत, याबाबत आंदोलकांना माहिती दिली.
मंत्री गिरीश महाजन हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी जवळपास एक तास बदलापूर स्थानकावर होते. त्यांनी सातत्याने माईकवरून उपस्थित आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलन थांबवण्याची त्यांची विनंती आंदोलकांनी धुडकावून लावली. आरोपीला इथे आणून फाशी दिली जावी, अशी मागणी आंदोलकांकडून लावून धरण्यात आली. अखेर आंदोलकांशी तासभर संवाद साधल्यानंतर शेवटी गिरीश महाजन तिथून निघाले. बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित?
आंदोलनात लाडकी बहीण योजनेचे फलक असल्याचं सांगताना गिरीश महाजन यांनी काही लोक राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप केला. “आता त्यावर मी काय सांगू. इथे काही लोक ‘माझी लाडकी बहीण’चे बोर्ड घेऊन उभे आहेत. हे काही लोक राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत”, असं गिरीश महाजन म्हणाले.
Badlapur Crime : “जे घडलं ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका”, अध्यक्षांना अश्रू अनावर
“इथे नेतृत्व कुणाचंच नाहीये. पण इथे काही बोर्ड लाडकी बहीणचे लागले आहेत. काही बोर्ड प्रिंट केलेले दिसतायत. बहुतेक ते रात्रीच प्रिंट केलेले दिसत आहेत. ते बोर्ड इथे आणून दाखवले जात आहेत. या घटनेतून कुणीही राजकीय फायदा घेण्याचं काम करू नये. अनेकजण तोंडसुख घेत आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत”, असंही ते म्हणाले.
सरकारकडून कोणती कारवाई?
दरम्यान, यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणात सरकारकडून कोणती कारवाई केली जात आहे, याबाबत माहिती दिली. “देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. एसआयटीची स्थापना झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केलं आहे. आणखीही दोन शिक्षकांना निलंबित केलं आहे. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेलं आहे. ज्या पोलिसांनी कामात दिरंगाई केली, त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तिथल्या निरीक्षकांनाही निलंबित केलं आहे. पण आंदोलकांचं म्हणणं आहे की आरोपीला इथे आणून इथेच मारून टाका. असा कुठला कायदा आपल्याकडे नाहीये”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“या आंदोलनात कुणाचं नेतृत्व नाहीये. कुणाशी बोलावं हे कळत नाहीये. कुणी कुणाचं ऐकत नाहीये. तरुणांचा राग साहजिक आहे. पण त्यासाठी रेल्वे लाईनच बंद करून ठेवायची हा त्यावरचा मार्ग नाही. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करू. यावर मार्ग निघेल. पण समस्या ही आहे की इथे कुणाचं नेतृत्व नाहीये. वेगवेगळ्या भागातले तरुण एकत्र आले आहेत. त्यामुळे कुणाशी बोलावं? कोण कुणाला समजावणार हा प्रश्न निर्माण झाला आहे”, अशी अडचण गिरीश महाजनांनी सांगितली.
“कसाबलाही शिक्षा व्हायला २-३ वर्षं लागले”
“लाखो लोकांना ट्रेननं घरी जायचंय, ये-जा सुरू व्हायला हवी. शक्यच नाही अशी मागणी करू नये. झालेली घटना संतापजनक आहे. आमच्याही मनात तेवढाच राग आहे. पण त्याला कायद्यानं शिक्षा द्यावी लागेल. कसाबनं आपले एवढे लोक मारले, पाकिस्तानवरून आला होता. पण त्यालाही शिक्षा द्यायला २-३ वर्षं लागले. शेवटी आपण त्याला फासावर लटकावलंच आहे. आपल्याला कायद्यानं चालावं लागेल”, असं ते म्हणाले.