ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात सोमवारी १९ वर्षीय मुलीने ३१ व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली. वर्षा उपाध्याय असे मृत मुलीचे नाव आहे. उत्तरप्रदेश येथून पाच महिन्यांपूर्वी ती तिच्या नातेवाईकांकडे घर काम करण्यासाठी आणि शिक्षणासाठी आली होती. या घरामध्ये मन रमत नसल्याने तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. चितळसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानपाडा येथील निळकंठ ग्रीन परिसरात ओलिविया व्हेरेथाॅन इमारत आहे. या इमारतीच्या ३१ व्या मजल्यावर वर्षा उपाध्याय ही तिच्या नातेवाईकांकडे राहण्यास आली होती. ती इयत्ता ११ वीचे शिक्षण घेत होती. तसेच नातेवाईकांकडे घरकाम करत होती. परंतु याठिकाणी तिचे मन रमत नव्हते. या बद्दल तिने आईला मोबाईलवरून संपर्क करून सांगितले होते. परंतु शिक्षण आणि भविष्यासाठी तिथेच राहा असे तिच्या आईने तिला सांगितले. रविवारी रात्री वर्षा हिने तिच्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा संपर्क होऊ शकला नाही. ती सोमवारी सकाळी ८ वाजता उठली. त्यानंतर तिने घरातील सज्जाजवळ दोन ते तीन फेऱ्या मारल्या. काही वेळाने तिने सज्जाचा काचेचा दरवाजा उघडून सज्जामध्ये प्रवेश केला. तेथे बसल्यानंतर तिने सज्जातून खाली उडी मारली.

हेही वाचा – तरूणाचे हात कापणारा मुरबाड पंचायत समितीचा माजी सभापती श्रीकांत धुमाळ अटक; एकूण पाच आरोपी अटक

हेही वाचा – अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवलीतील तरूणाची फसवणूक

सज्जाजवळ फेऱ्या मारतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना प्राप्त झाले आहे. आत्महत्येपूर्वी तिने कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. परंतु येथे मन रमत नसल्याने तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl committed suicide by jumping down from the 31st floor incident at manpada ssb
Show comments