बदलापूर: अतिसाराने एका अडीच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूर शहरात समोर आला आहे. आदिवासी कुटुंबात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. याचा त्रास एकाच कुटुंबातील सहा जणांना झाला. यातील चौघे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात तीन मुले आणि आईचा समावेश आहे. अंधश्रद्धेतून मुलीला वेळीच उपचार दिले गेले नाहीत, असाही संशय आता व्यक्त केला जातो आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने कुटुंबांची तपासणी करून परिसराचेही सर्वेक्षण केले आहे.
बदलापूर पश्चिम येथील सोनिवली येथे आदिवासी वाडी आहे. येथील गौऱ्या मिरकुटे यांच्या कुटुंबात गुरुवारी एका अडीच वर्षाची चिमुकलीला उलट्या आणि जुलाब होत होते. त्यांनी काही खाजगी रुग्णालयांमध्ये मुलीला उपचारासाठी नेले. मात्र त्या रुग्णालयांनी सरकारी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मिरकुटे कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्या अवस्थेत अडीच वर्षीय मुलीला घरीच ठेवले. या मुलीसह चार वर्षीय मुलीलासुद्धा उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास या अडीच वर्षीय सपना मिरकुटे हिचा घरीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच या परिसरातील आशा सेविका ममता मेहेर यांनी तात्काळ घरी भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांना दुसऱ्या मुलीला रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला मात्र कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. करणी केल्याने मुलांना त्रास होत असल्याचा समज करत त्यांनी उपचार करण्यास नकार दिला, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे. त्यावेळी परिसरातील समाजसेवक प्रकाश मेहेर यांच्या मदतीने त्यांची समजूत काढून चार वर्षीय मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे तिचा जीव वाचला.
हेही वाचा – टिटवाळ्यात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
गेल्या दोन दिवसात या कुटुंबातील सहा जणांवर उपचार झाले आहेत, अशी ही माहिती डॉ. अंकुश यांनी दिली आहे. सध्या मुलीची आई आणि त्यांची तीन अपत्ये उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कुटुंबात एकूण सात मुले असून ११ जणांचे कुटुंब असल्याचे समजते आहे. या कुटुंबीयांना नेमका कशामुळे हा त्रास झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. काहीतरी खाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. मात्र फक्त अंधश्रद्धेच्या आहारी जात उपचार टाळल्याने बदलापूर सारखे शहरात चिमुकलीच्या मृत्यूने एकच हळहळ व्यक्त होते आहे.