अभिनेत्री होण्याचे स्वप्न दाखवून ठाण्यातील एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर सदर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने सदर प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कापूरबावडी पोलीस ठाण्यात उद्योगपती श्याम भारतिया आणि इतर तीन लोकांविरोधात बलात्कार, धमकावणे आणि जातीय शिवीगाळ करणे, असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर जुबिलंट फूडवर्क कंपनीचे प्रमुख श्याम भारतिया यांच्यावतीने कंपनीने निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनातून त्यांनी भारतिया यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप बिनबुडाचे, खोटे आणि अपमानास्पद असल्याचे भारतिया यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर पीडित महिलेच्या याचिकेची सुनावणी झाली असता खंडपीठाने ठाणे पोलिसांना एफआयआर दाखल करून घेण्याचे आदेश दिले. यानंतर जुबिलंट फूडवर्क्सने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात आपली बाजू मांडली आहे.
“जुबिलंट भारतिया ग्रुपचे अध्यक्ष श्याम एस. भारतिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याच्या बातम्या माध्यमात दाखविल्या जात आहेत. त्याबद्दल श्याम भारतिय यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदर आरोप बिनबुडाचे, खोटे आणि अपमानास्पद असून द्वेषातून दाखल झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची कॉपी आमच्याकडे आहे. आम्ही न्यायालयाच्या निकालाचा आदर करत असून पोलिसांना तपासात सहकार्य करू. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर अधिक बोलणे उचित नाही. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचा कंपनीच्या कारभारावर कोणताही परिणाम होणार नाही”, असे जुबिलंट कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
१८ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिल्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये पीडितेने सांगितल्यानुसार, अभिनेत्री होण्यासाठी पीडितेने आरोपी पूजा कवंलजीत सिंगची भेट घेतली होती. चित्रपटसृष्टीत काम देतील, अशा काही महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घालून देईल, असे आश्वासन आरोपीने दिले. त्यानंतर ३ मे २०२३ रोजी सदर महिलेने आरोपी भारतिया यांची सांताक्रूझ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घडवून दिली.
यानंतर भारतिया यांनी पीडितेला सिंगापूर येथे येण्याची विनंती केली. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, १९ मे २०२३ रोजी भारतिया यांनी पीडितेला सिंगापूरमधील आपल्या घरी नेले. तिथे मद्य पिण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार केला. यावेळी दुसऱ्या आरोपी पूजा सिंगने या घटनेचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन माझ्यावर अत्याचार करण्यात आला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले. यानंतर अंधेरी आणि ठाणे येथे वारंवार अत्याचार झाल्याचेही नमूद केले आहे.