करोना काळानंतर बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा बंद केली. काही कंपन्यांमध्ये अजूनही ही सुविधा चालू आहे. अनेक ठिकाणी डेस्कटॉप कम्प्युटर्सची जागा लॅपटॉपनं घेतली. हे लॅपटॉप कर्मचाऱ्यांना सोबत वागवावेही लागतात. त्यामुळे मुंबईतील लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांच्या बॅगेत हल्ली लॅपटॉप असतात. एकीकडे गर्दीत हे लॅपटॉप सांभाळण्याची कसरत आणि कुणी ते चोरू नये यासाठीची दक्षता अशा दोन्ही गोष्टी मुंबईकर प्रवासात करत असतात. कल्याणमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या एका घटनेनंतर मुंबईकरांनी असे लॅपटॉप सोबत बाळगताना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलंय कल्याणमध्ये?

कल्याण रेल्वेस्थानकावर पूर्वेकडील पार्किंगच्या भागात हा सगळा प्रकार घडला. यामुळे पीडित तरुणी घाबरली असून तिनं तातडीनं पोलिसांकडे याची तक्रार केली आहे. पोलिसांनीही या तरुणीच्या तक्रारीवरून दोन भामट्यांचा शोध सुरू केला आहे. अंगावर टाकलेल्या ज्वलनशील रसायनामुळे ही तरुणी जखमी झाली असून नजीकच्याच रुग्णालयात उपचार घेत आहे.

सदर तरुणी यूपीएससीची तयारी करते. यासाठी मुंबईत अंधेरी इथं तिनं क्लासदेखील लावला आहे. अभ्यासासाठी कल्याणमध्ये राहणाऱ्या आपल्या एका सहकाऱ्याकडून तिनं लॅपटॉप नेला होता. तो लॅपटॉप परत करण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ही तरुणी कल्याणला आली. कल्याण पूर्वेकडच्या लोकग्राम परिसरात तिचा हा सहकारी राहतो. त्यासाठी ही तरुणी कल्याण रेल्वेस्थानकावर उतरली. यावेळी तिच्याजवळ बॅगेत लॅपटॉपही होता.

अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून भामटे पसार

या तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर कल्याण पूर्वेकडच्या पार्किंग परिसरातून ती पुढे निघाली. पुढच्या नाल्याच्या बाजूने ती वळली आणि दोन अज्ञात इसम तिच्याजवळ आले. त्यांनी तरुणीच्या अंगावर काहीतरी द्रव पदार्थ फेकला. यामुळे तरुणीच्या अंगाला जळजळ होऊ लागली. तिची ओढणी तर पूर्णपणे जळाली. तिच्या डोळ्यांवर अंधारी आली. तरुणीचा ताबा सुटत असल्याचं पाहून त्या दोन व्यक्तींनी तिच्या हातातली लॅपटॉपची बॅग हिसकावून घेतली आणि तिथून पोबारा केला!

रेल्वेगाडीत लैंगिक अत्याचार झाल्याचा मॉडेलचा आरोप, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

“काल मी क्लासहून कल्याण स्टेशनला उतरले. कल्याण पूर्वेला बाहेर पडल्यानंतर नाल्याजवळ जेव्हा मी वळले, तेव्हा तिथे कुणीतरी माझ्या अंगावर काहीतरी टाकलं. त्यामुळे माझा श्वास अडकायला लागला. डोळ्यांसमोर अंधारी आली. माझ्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. माझ्याकडे तेव्हा एक बॅग होती, त्यात लॅपटॉप होता. एक हारही होता. ते चोरीला गेलं आहे. मी तेव्हा जो ड्रेस घातला होता, त्याची ओढणी जळाली. ड्रेस खराब झाला”, अशी माहिती पीडित तरुणीनं दिली आहे.

कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकारानंतर पीडित तरुणीनं कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीस या अज्ञात भामट्यांचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl robbed for laptop at kalyan east railway station police inquiry rno news pmw