लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याणमधील आई आणि तिची अल्पवयीन मुलगी उत्तराखंड ऋषिकेश येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथे महिलेचा (आई) मित्र आला होता. या तिघांनी ऋषिकेष भागात पर्यटन केले. नंतर एका हॉटेलमधील निवासात मित्राने आपल्या मैत्रिणीच्या सहमतीने अल्पवयीन मुलीला पाण्यात गुंगीचे औषध टाकून दिले. मुलीला गुंगी आल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत मित्राने या मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

हा प्रकार पीडित मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात आपली पत्नी आणि तिच्या मित्रा विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-घोडबंदर भागात विद्युत वाहिन्या जळाल्याने वीजपुरवठा खंडीत, नागरिक हैराण

हा सगळा प्रकार उत्तराखंड ऋषिकेश परिसरातील लक्ष्मण झुला पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. त्यामुळे खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची सर्व कागदपत्रे अधिकच्या तपासासाठी उत्तराखंड येथे पाठविण्याची कार्यवाही कल्याणच्या पोलिसांनी सुरू केली आहे. महिलेच्या पतीने याप्रकरणी तक्रार अर्ज खडकपाडा पोलीस ठाण्यात दिला होता. त्या चौकशी अर्जाच्या माध्यमातून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी उत्तराखंड भागात ऋषिकेश लक्ष्मण झुला भागात पर्यटनासाठी गेले होते. या पर्यटनाच्यावेळी संबंधित महिलेचा मित्र तेथे आला होता. या तिघांची ऋषिकेश येथे भेट झाली. या तिघांनी आपल्या निवासासाठी तेथील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. हाॅटेलमधील मुक्कामात असताना महिलेच्या मित्राने महिलेशी संगनमत करून सोबतच्या अल्पवयीन मुलीला पाण्यातून गुंगीचे औषध दिले. मुलगी गुंगीत गेल्यावर त्याचा गैरफायदा घेत महिलेच्या मित्राने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

आणखी वाचा-रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला

मुलगी शुध्दीत आल्यावर तिला आपल्या सोबत घडलेला प्रकार समजला. आपल्या आईच्या समक्ष हा प्रकार होऊनही ती काहीही न बोलल्याने पीडित मुलगी खूप अस्वस्थ होती. तिने घडला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात पत्नी, तिच्या मित्रा विरुध्द तक्रार केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. उत्तराखंड पोलीस आणि खडकपाडा पोलीस एकत्रितपणे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.