आशयघन वैचारिक मते, विविध विषयांची चपखल मांडणी आणि आत्मविश्वासाने भारलेल्या भाषणांनी गुरुवारी ठाण्यात ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धा गाजली. ठाण्यातील शिवसमर्थ शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातील ३२ महाविद्यालयांतील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्राथमिक फेरीत मुलींनी बाजी मारत नऊपैकी आठ अंतिम विजेतेपदांवर मोहर उमटवली. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणारी ‘वक्ता दशसहस्रेषु’ ही वक्तृत्व स्पर्धा जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांमध्ये होत आहे.
महाराष्ट्राला दिग्गज फडर्य़ा वक्त्यांची मोठी परंपरा लाभली आहे. या वक्त्यांच्या परंपरेला नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न लोकसत्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून केला आहे, अशी प्रतिक्रिया या वेळी उपस्थित परीक्षक आणि प्रेक्षकांनी दिली. दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय असल्याने त्यावर बोलण्यासाठी तरुणाई उत्सुक होती. ‘आपल्याला नायक का लागतात?’ या विषयावर सर्वाधिक स्पर्धकांनी मते मांडली. पाश्चिमात्य नायकांच्या बरोबरीने देशातील तसेच राज्यातील प्रभावी नेत्यांची परंपरा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न तरुणांनी केला. भविष्यकाळात प्रत्येक जण स्वत:बरोबरच दुसऱ्यांसाठीही नायक ठरू शकतो, असा विश्वास स्पर्धकांनी जागवण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये काहींची भलतीच हवा असते. प्रत्यक्षात ‘तो’ नायक असतोच असे नाही, असे मतही काही तरुणांनी व्यक्त केले.
‘सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम’ या विषयावर बोलताना तरुणांनी राजकारण आणि समाजकारण यांच्यातील ऋणानुबंध उलगडले.
ओरडल्याशिवाय न्याय मिळत नाही, त्यामुळे चळवळी जन्माला येतात आणि याच चळवळीतून राजकारण जन्माला येत असते. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. ‘जगण्याचे मनोरंजनीकरण’ या विषयावर सद्यकाळातील परिस्थितीचा वेध स्पर्धकांनी घेतला.
प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. मीनल सोहनी, अरुंधती भालेराव आणि प्रा. अरुण मैड यांनी या वेळी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी एलआयसीचे प्रतिनिधी संजय मोरे उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा