अंबरनाथ नगरपालिकेने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी ‘मुलगी वाढवा, मुलगी वाचवा’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून नगरपालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची रोख रक्कम विशिष्ट बँकेत मुदत ठेवीने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलगी अठरा वर्षांची झाली की तिला या खात्यातून एक लाख रुपयांचा निधी मिळू शकेल, अशी तजवीज केली जाणार आहे.
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. तसेच राज्यातील स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाणदेखील जास्त असल्याची माहिती मध्यंतरी उघडकीस आली होती. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुली बचाव’ अभियान हाती घेतले असून यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही त्यासंबंधी पावले उचलण्यात आली आहेत. या पाश्र्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिकेने स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. एकीकडे देश आधुनिकतेच्या मार्गाने निघाल्याची चर्चा आपण करतो आणि दुसरीकडे महिलांवर भयावह असे अत्याचार होत असल्याच्या घटना उघडकीस येतात, हे मुळात धक्कादायक आहे. त्यामुळे ‘बेटी बचाव’ अभियानाचा एक भाग होता यावे यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुलीच्या जन्मानंतर लगेचच १० हजार रुपयांची मुदत ठेव ठेवायची आणि ती १८ वर्षांची झाली की सुपुर्द करायची, अशी ही योजना आहे. मुलगी १८ वर्षांची होताच किमान एक लाख रुपयांचा निधी तिला मिळावा, असा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. या पैशांचा उपयोग तिचे पुढील शिक्षण, लग्न, आरोग्यासाठी मुलीला करता येणार आहे. याचा फायदा शहरातील गोरगरीब कुटुंबाना मिळणार आहे. नगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव बहुमताने मंजूर झाला आला असून महिला व बाल संगोपन निधीतून यासाठी साठ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीला पाठविण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा