आमच्या स्वप्नातील
कल्याणचे नागरीकरण होत आहे. त्या प्रमाणात समस्या वाढत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका अनेक वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या कल्याण पूर्व भागाला बसत आहे. कल्याण पूर्व भाग लहान-मोठय़ा टेकडय़ा, उंच सखल भागात आहे. या भौगोलिक रचनेप्रमाणे या भागात घर, इमारती, चाळींची रचना आहे. गटारे, पायवाटा, रस्ते बांधताना अनेक ठिकाणी अडचणी येतात. काही ठिकाणी गटारे नाहीत. तेथील सांडपाणी थेट गटाराबाहेर फेकले जाते. इतस्तत: पसरलेले हे सांडपाणी दरुगधीचे साम्राज्य निर्माण करते. पाणीपुरवठय़ाच्या बाबतीत हा भाग नेहमीच पालिकेकडून दुर्लक्षित राहिला. अनेक वर्षे कल्याण पूर्व भागाला मुबलक पाणी मिळत नाही. या भागातील रहिवासी पाण्यासाठी वणवण, चणचणीला तोंड देत आहेत.
पूर्व भागात उद्याने, बगीचे, खेळ मैदाने आदी नागरी सुविधांसाठी काही ठिकाणी भूखंड आहेत. या भूखंडांचा वापर काही समाजकंटक इमारती, चाळी बांधण्यासाठी करीत आहेत. परिसरातील नागरिकांच्या नागरी सुविधांचा लाभ घेण्याच्या हक्कावर गदा आणली जात आहे. पालिका प्रशासन या विषयावर गप्प आहे. कल्याण पूर्व भागातील टेकडय़ांचे पालिकेने संवर्धन केले. तेथे हिरवाई विकसित केली तर या टेकडय़ा लहान पर्यटनाची ठिकाणे म्हणून विकसित होऊ शकतील. अलीकडे घराबाहेर पडले तर मोकळे वातावरण नाही. उद्याने नाहीत. रस्त्यावर वाहतूक कोंडी. कोणीही व्यक्ती इच्छा असूनही या गजबजलेल्या वातावरणामुळे घराबाहेर पडत नाही. आहे त्या टेकडय़ांवर झोपडय़ा, चाळी बांधल्या जात आहेत. कल्याण पूर्व भागात वाहनाने यायचे म्हणजे अनेकांच्या छातीत धस्स होते. चक्कीनाका, काटेमानिवली, नेतिवली, तिसगाव नाका परिसर, मेट्रोमॉल, बिगबझार रस्ता सतत वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. या परिसरात वाहनांमुळे प्रदूषण होते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. याचा कोणी विचार करताना दिसत नाही. या गजबजलेल्या भागात उड्डाण पूल, भुयारी मार्ग बांधता येईल का, याचा विचार होणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा