जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांचा सल्ला
आजच्या स्पर्धात्मक युगात पाल्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्याची संधी देणे आवश्यक आहे, असे मत ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी व्यक्त केले. पालकांनी थोडा कणखरपणा दाखविल्यास पुढील आयुष्यात मुलांचा फायदा होईल, असेही त्या या वेळी म्हणाल्या. ‘आयपीएच’ आयोजित वेध व्यवसाय परिषदेत शनिवारच्या सत्राची सुरुवात डॉ. अश्विनी जोशी यांच्या गप्पांनी झाली.
अश्विनी यांचा जन्म चिपळूण येथे झाला. शालेय जीवनापासूनच त्या गुणवंत विद्यार्थी म्हणून शाळेत ओळखल्या जात असत. मराठी, इतिहास, गणित, विज्ञान हे विषय आवडीचे असणाऱ्या जोशी यांनी शाळेत असताना आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञा परीक्षांमध्ये यश संपादन केले होते. डॉक्टर होण्याचे पहिले स्वप्न मी आयुष्यात पाहिले, असे त्यांनी या वेळी आपल्या मुलाखतीत सांगितले. जोशी यांच्या एकत्र कुटुंबात तब्बल ३५ डॉक्टर असल्याने साहजिकच त्यांचा कल वैद्यकीय शिक्षणाकडे होता. दंतचिकित्सेचे शिक्षण घेतलेल्या डॉ. अश्विनी जोशी यांचे सुरुवातीला वैद्यकीय शिक्षणात मन रमले नाही; तरीही त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले. दंतचिकित्सकाची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची जय्यत तयारी सुरू केली.
वसतिगृहातील आयुष्य, दंतचिकित्सकेचे काम आणि अभ्यास यांचा साधलेला ताळमेळ त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. प्रशासकीय सेवेत यायचे असेल तर ‘डोळसपणा’ आवश्यक आहे, असे त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. आयुष्यात छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून आनंद घेता यावा, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा