उल्हासनगरच्या जय भवानी मित्र मंडळाने उल्हासनगरच्या कॅम्प पाच येथील नेताजी चौक भागात लावलेल्या दहीहंडीला एका मद्यधुंद तरुणाने दोरीला लटकून येत फोडली. रात्री उशिरा रंगलेल्या या थरारनाट्यानंतर भोला वाघमारे या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मात्र त्याला न्यायालयासमोर उभे केले असता आरोपींच्या वकिलांनी आरोपीला जामीनासह बक्षिसाची ५५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली. या मागणीमुळे न्यायाधीशही चक्रावले. या मागणीनंतर आरोपीला जामीन मिळाला आहे. पुढील सुनावणीत बक्षिसाच्या रकमेवर पुन्हा युक्तिवाद केला जाईल, असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ठाणे : वर्गणी दिली नाही म्हणून ‘आयबी’ अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न

गोपाळकाला उत्सवाच्या दिवशी जिल्ह्यातील विविध ठिकाणी मंडळ, राजकीय नेते, पक्ष यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. उल्हासनगरता कॅम्प पाच भागातील नेताजी चौक येथे जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर अनेक गोविंदा पथकांनी सलामी देत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे रात्री साडे दहा वाजेपर्यंत हंडी फुटली नव्हती. रात्री साडे दहाच्या सुमारास दहीहंडी फोडण्याचा तयारीत गोविंदा पथके होती. चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती. त्याचवेळी हंडी बांधलेली दोराला एक तरुण लटकत पुढे पुढे हंडीकडे सरकत असल्याचे दिसून आले होते. आयोजक आणि गोविंदा पथकांनी आरडाओरडा करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तरुणाने थेट दहीहंडीपर्यंत जात त्याने दहीहंडी फोडली. त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात आले. या प्रकारानंतर उत्सवात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी हंडी फोडणाऱ्या भोला वाघमारे (२३) याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याने मद्य प्राशन केल्याचे समोर आले. आरडाओरडा करत असल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर मद्यप्राशन करून गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला जामीन तसा द्यावा यावर चर्चा झाली. यावेळी सुमित गेमनानी यांनी आरोपी भोला वाघमारे याची बाजू मांडली.

आरोपीला जामिनासह बक्षिसाची ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीसही द्यावे, अशी मागणी आम्ही न्यायालयात केली, असे गेमनानी यांनी सांगितले. आरोपीच्या वकिलांनी केलेल्या या मागणीवर न्यायाधीशही चक्रावले. आरोपीने या ठिकाणी गोंधळ घातला असला तरी त्याने दहीहंडी फोडली. त्यामुळे करारानुसार हंडी फोडणारा बक्षिसाचा हकदार आहे, अशी बाजू न्यायालयात मांडल्याचे गेमनानी यांनी सांगितले. हंडी कशाप्रकारे फोडावी याबाबत कोणतीही नियमावली आयोजकांनी दिली नव्हती. त्यामुळे हंडी फोडणाऱ्याला बक्षीस द्यावेच लागेल, असाही दावा गेमनानी यांनी केला. या सर्व मागणीनंतर आरोपी भोला वाघमारे याला जामीन देण्यात आला. बक्षिसावर येत्या सुनावणीत चर्चा होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र या सर्व प्रकारची सर्व शहरात मोठी चर्चा रंगली आहे. आरोपी भोला वाघमारे हा पदपथावर राहतो. तो अकरावी उत्तीर्ण आहे. मात्र त्याला अद्याप नोकरी नाही. त्यामुळे त्याला या खेळाबद्दल ५ टक्के आरक्षणात समाविष्ट करून नोकरी द्यावी, असे मतही गेमनानी यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. त्याला स्वतःच्याच सुरक्षेवर जामीन देण्यात आल्याचे गेमनानी यांनी सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give reward money to drunken govinda the judge balked at the demands of the lawyers amy