काही शाळा, संस्था बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन आपली पावले टाकतात, वेळोवेळी आपल्या धोरणात जाणीवपूर्वक बदल करतात. ठाण्यातील कमलिनी कर्णबधिर विद्यालय शाळादेखील बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन कर्णबधिर विद्यार्थ्यांना घडवू पाहत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे व्यापक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शाळा विशेषत्वाने प्रयत्न करू पाहते आहे. शालेय अभ्यासक्रम आणि विविध प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, जेणेकरून ते भविष्यात आत्मनिर्भर होतील, अशी सांगड घालण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कमलिनी शाळेतर्फे केला जात आहे.
१९९० साली बकुळताई देवकुळे यांनी कमलिनी कर्णबधिर विद्यालयाची (भारतीय स्त्री जीवन विकास परिषद संचालित) स्थापना केली. हिंदी माध्यमाच्या या शाळेत शिशू ते इ. ७वीमध्ये एकूण ५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, भावनिक प्रगती साध्य करण्यास प्राधान्य दिले जाते ते सर्वागीण विकासाचे व्यापक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून. या शाळेतील विद्यार्थी जन्मत:च कर्णबधिर आणि अति तीव्र श्रवणऱ्हास या वर्गातील आहेत. बहुसंख्य विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील आहेत. काही घरांतील एकाहून अधिक कर्णबधिर मुलेदेखील शाळेत आहेत. त्यामुळे एकंदरीतच शाळेत आलेल्या प्रत्येक मुलाला जाणून घेऊन, समजून घेऊन तो शाळेत रुळेल, असा शाळेचा व शिक्षकांचा पहिला प्रयत्न असतो. मुलांना शाळेत जरी शिक्षण दिले जात असले, तरी शाळेबाहेर पडल्यावर तो आत्मनिर्भर व्हावा म्हणून शाळेतर्फे वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबविले जातात.
ही मुले जरी कर्णबधिर असली तरी चित्रकला, हस्तकला, पेंटिंग इ. कला त्यांच्यात उपजतच दिसून येतात. या कला विकसित होण्याच्या दृष्टीने कागद आणि कापडापासून आकर्षक फुले आणि पिशव्या, रुमाल आणि कापडावरील पेंटिंग, शुभेच्छा कार्डे, भिंतीवरील फ्रेम्स इ. गोष्टी आवर्जून करून घेतल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांची अभ्यासात चांगली प्रगती दिसून येते आणि जे भविष्यातही त्यात सातत्य राखतील त्यांना इतर शाळांमध्ये समावेशित करण्याचा शाळेतर्फे प्रयत्न केला जातो. या मुलांना शिक्षण आणि प्रॅक्टिकल यांची सांगड घालून सक्षम करणे, ही मुलांची आणि पालकांची खरी गरज आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांना ब्युटीपार्लर, मेहंदी, बेसिक अ‍ॅडव्हान्स टेलरिंग कोर्स, पेंटिंग, एम्ब्रॉयडरी कोर्स, पेपर क्विलिंग कोर्स, ज्वेलरी मेकिंग इ. विषयासंदर्भातील मार्गदर्शन शाळेतच दिले जाते. या सर्व कलांमध्ये त्यांचे प्रावीण्य दिसून येते, पण त्याचबरोबर भविष्यात ते स्वत:च्या पायावर उभे राहतील (आणि कोणालाही ते भार वाटणार नाहीत) या दृष्टीने कमलिनी शाळा बरेच उपक्रम विचारपूर्वक राबवीत आहे. इंग्रजीमुळे ते मागे पडू नयेत, कारण सध्याची ती गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊन इ.१ लीपासून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा परिचय करून दिला जातो. या मुलांना दैनंदिन व्यवहार आणि संभाषण या दृष्टीने आवश्यक असे इंग्रजीचे मार्गदर्शन दिले जाते.
या मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकलेच्या शासनमान्य परीक्षा एलिमेंटरी, इंटरमीजिएट यांचे मार्गदर्शन शाळेतर्फे दिले जाते. साधारणपणे इ. ४ थीपासूनच वारली चित्रकलाविषयक मार्गदर्शन देण्यास सुरुवात होते. उपजतच कला असल्याने ही मुले वारली चित्रकला प्रकारातही आपले प्रावीण्य दाखवितात. खरं तर या मुलांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि संधी मिळाली तर त्याचे ती चीज करतात. कमलिनीच्या विद्यार्थ्यांनी ठाण्यातील बायर कंपनीच्या पुढे ७०० फूट भिंत वारली चित्रकलेने सजवली आहे. त्याचा हा कलाविष्कार पाहताना आपण खरोखरच थक्क होतो. कमलिनीच्या १५ ते १६ विद्यार्थ्यांनी ६ दिवस रोज ५ ते ६ तास यासाठी दिले आणि कलाविष्कार साकार झाला. ठाणे महापालिकेची उद्याने, काही गृहनिर्माण संकुले, मुलुंडला सु. ल. गद्रे सभागृहाच्या बाहेरील बाजूस, मखमली तलावाच्या प्रदर्शनी भिंतीवर आपण कमलिनीच्या विद्यार्थ्यांच्या कलेचा अनुभव घेऊ शकतो.
सध्याच्या काळात कॅमेऱ्याला किती महत्त्व प्राप्त झाले आहे हे आपण सर्व जण जाणतोच. कर्णबधिर विद्यार्थ्यांना कॅमेऱ्याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम राबविणारी कमलिनी ही बहुधा ठाण्यातील पहिली शाळा असावी. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना कॅमेरा म्हणजे काय, त्यांचे विविध भाग आणि त्याची कार्ये, फोटो कसा काढायचा इ. गोष्टींचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले. कधी आकृत्या काढून, कधी स्लाइडच्या साह्य़ाने कधी विशेष शिक्षकांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना उद्याने, येऊर, तळे, मार्केट इ. विविध ठिकाणी नेऊन प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात आला. भविष्यात मुले स्वत: फोटोग्राफी करू शकतील या दृष्टीने संपूर्ण प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आणि फोटोसर्कल सोसायटीच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. २०१२ साली गडकरी रंगायतन येथे भरवण्यात आलेले कमलिनीच्या विद्यार्थ्यांचे छायाचित्र प्रदर्शन सर्वाचीच दाद घेऊन गेले.
शाळेच्या विद्यार्थ्यांना एमएससीआयटी, आयटीआय या संस्थांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम करण्यासाठी उद्युक्त केले जाते. त्याचबरोबर संगणक प्रशिक्षण, टू व्हीलर मेकॅनिक कोर्स याचेही प्रशिक्षण शाळेतच दिले जाते. नुकतेच १०वी उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत आहेत. शाळेच्या दोन विद्यार्थिनी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. शाळेच्या वीस विद्यार्थ्यांना कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या भागांतील उद्योग क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली, ही विशेषत्वाने नमूद करण्याजोगी बाब आहे. रबाळे येथील औद्योगिक क्षेत्रातही कमलिनीच्या विद्यार्थ्यांना नोकरीवर ठेवण्यात आले आहे.
कर्णबधिरत्व घेऊन मुलांनी शाळेत येणे, शाळेत रुळणे, त्यांच्या क्षमतांचा विकास होणे, व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे, मुख्य म्हणजे आत्मविकास प्राप्त होणे आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेऊन बाहेरच्या जगात खंबीरपणे उभे राहण्यासाठी सक्षम होणे हा एक मोठा प्रवास असतो. खरे तर ही ठ१ें’ीिंऋ मुले आहेत. कर्णबधिरत्व वगळल्यास ती सर्वसाधारण मुलेच असतात, पण दुर्दैवाने त्यांच्या या कर्णबधिरत्वामुळे ती काहीशी दुर्लक्षित, एकटी पडतात. काही वेळा त्यांची अतिकाळजी किंवा अतिलाड केले जातात किंवा घरात सर्वसाधारण मूल असेल तर त्याला आपल्यातल्या दोषाची सतत जाणीव होते. त्यामुळे शाळेत येणारे मूल समजून घेऊन त्याला समवयस्कांबरोबर रुळण्यासाठी शाळेतर्फे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. खरे तर त्यांच्यात खूप गुण असतात आणि त्यांना प्रेमाने समजून घेऊन मार्गदर्शन दिल्यास त्यांची शिकण्याची, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचीही तयारी असते. गरज असते ती त्यांना समजून घेऊन मार्गदर्शन देण्याची. या टप्प्यावर समाजानेही सहकार्याचा हात पुढे करण्याची, त्या मुलाला आणि कुटुंबाला सामावून घेण्याची, योग्य तऱ्हेने प्रशिक्षण घेतलेल्या आणि क्षमता असलेल्या मुलाला आत्मनिर्भर होण्यासाठी संधी देण्याची, तरच कमलिनीसारख्या शाळांच्या अथक प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश प्राप्त होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा