कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथील बुधाजी चौक भागातील एका मटण विक्रेत्याने नवीन वर्षानिमित्त आयोजित मेजवान्यांसाठी मटणाची मागणी वाढणार असल्याने ४९ हजार रुपये किमतीचे १२ अधिक बकरे दुकानात आणून ठेवले होते. दुकान बंद असताना रात्रीच्या वेळेत दुकानाची खिडकी तोडून सर्व बकरे चोरट्यांनी चोरुन नेले आहेत.
हेही वाचा >>>अंबरनाथः दोन कार अपघातात एकाचा मृत्यू एका चालकाची डुलकी, तर दुसऱ्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात
दोन दिवसात एवढे बकरे आणायचे कोठुन आणि पैसे कसे उभे करायचे असा प्रश्न मटण विक्रेत्यासमोर पडला आहे. गेल्या महिन्यापासून अनेक ग्राहकांनी या मटण विक्रेत्याकडे वर्षाखेरीस आयोजित मेजवान्यांसाठी मटणाची नोंदणी केली आहे. त्यांना आता काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न विक्रेत्याला पडला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत कामगार घरी सामान बांधण्यासाठी आले आणि चोरी करुन गेले
पोलिसांनी सांगितले, अदनान ख्वाजा कुरेशी (२१, रा. कोनगाव, भिवंडी) असे मटण विक्रेत्याचे नाव आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षा निमित्त आयोजित विविध ठिकाणच्या मेजवानींसाठी मटण लागणार असल्याने मटण विक्रेेते अदनान यांनी १२ तगडे बकरे मानपाडा येथील महाराष्ट्र मटण दुकानाच्या पाठीमागील बंदिस्त खोलीत आणून ठेवले होते. नवीन वर्षानिमित्त आयोजित मेजवान्यांना मटण पुरवठ्याची जबाबदारी अदनान यांनी घेतली होती. आता बकऱ्यांची चोरी झाल्याने त्यांना मटण कुठून पुरवायचे असा प्रश्न विक्रेत्यासमोर पडला आहे. शनिवार, रविवारच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजुकडील खिडकीची लोखंडी जाळी तोडली. त्यामधून दुकानात प्रवेश केला. त्या खिडकीजवळ टेम्पो उभा करुन खिडकीव्दारे बकऱ्यांची चोरी करण्यात आली आहे, असे तक्रारदार अदनान यांनी सांगितले.दुकान परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या आधारे पोलिसांनी चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी तक्रारदार अदनान कुरेशी यांनी केली आहे.